शिरूर तालुक्यात दुचाकीवरुन जाणाऱ्या सराफाला लुटले; FIR दाखल

शिक्रापुर : शिरूर तालुक्याच्या  वडगाव नागरगाव रस्त्यावर  सराफाला दुचाकीवरून आलेल्या व्यक्तींनी धमकी देत सुमारे ९ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत जयंतीलाल कांतीलाल ओसवाल यांनी शिरूर पोलिस स्टेशन ला फिर्याद दिली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,फिर्यादी ओसवाल हे सोन्याचे व्यापारी असून ते सोन्याचे दागिने सप्लाय करण्याचा व्यवसाय करतात. दि.२५ रोजी फिर्यादी हे नेहमीप्रमाने सकाळी उरुळी कांचन येथून दुचाकीवरून दागिने घेऊन निघाले. काष्टी येथील काम आटोपून ते तांदळी मांडवगण फराटा या रस्त्याने जात होते.दरम्यान वडगाव रासाई ते नागरगाव दरम्यान आले असताना दुचाकी वरून आलेल्या अज्ञात आरोपींनी फिर्यादी यांना धमकावून फिर्यादी ओसवाल यांच्या जवळ असणाऱ्या पिशवीतून प्लॅस्टिक बॅग मध्ये असलेले दागिने,लहान कापडी पिशवीत असलेले असे सर्व प्रकारचे मिळून सुमारे २००ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व काळी बॅग असा एकूण ९ लाख २०हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.यानंतर फिर्यादी यांनी पोलिस स्टेशन ला धाव घेत अज्ञात आरोपी विरुध्द तक्रार दाखल केली आहे.

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत शिरूर पोलिसांनी तक्रार दाखल करून घेत आरोपींचा शोध सुरू केला आहे.पुढील तपास शिरूर पोलिस करत आहेत.