… म्हणून मुलाला अग्नी देणार्‍या वडिलांनीच दिली होती ‘खात्म्या’ची सुपारी, सोलापूरातील धक्कादायक घटना

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – घरात सर्वांना त्रास देतो व शेतातील वाटणी मागतो म्हणून वैतागलेल्या बापाने आपल्या पोटच्या मुलालाच मारण्याची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार सोलापूरमध्ये उघडकीस आला आहे. सुरेश घोडके असे आरोपी बापाचे नाव असून शैलेश घोडके असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. पोलिसांनी सुरेश घोडके याच्यासह चौघांना अटक केली आहे. आरोपींना 17 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मृत शैलेश घोडके याचा 29 जानेवारी रोजी कुंभारी गावाजवळ मृतदेह आढळून आला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, कुंभारी गावाजवळ एक तरुण बेशुद्ध अवस्थेत सापडला होता. स्थानिकांनी तरुणाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र पोलिसांनी त्याला मृत घोषित केले. मृत तरुणाच्या गळ्यावर मारल्याच्या खुणा असल्याने त्याचा खून झाल्याचा संशय पोलिसांना आला होता. तपासामध्ये मृत शैलेश याच्या वडिलांवर पोलिसांना संशय आला. पोलिसांनी आरोपी सुरेश घोडके याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्हा कबूल केला. मुलाला मारण्यासाठी सुपारी दिल्याचे त्याने चौकशीत कबूल केले.

मृत शैलेश हा शेत जमीन नावावर करून देण्यासाठी वडिल सुरेश घोडके यांच्यामागे लागला होता. याच कारणावरून दोघांमध्ये सतत वाद होत होते. मुलाच्या त्रासाला कंटाळून वडिलांनी शेताच्या शेजारी राहणाऱ्या मित्रांना सांगून मुलाचा खून करण्यासाठी 2 लाखांची सुपारी दिली. सुरेश घोडके याने मुलाला मारण्यासाठी शंकर वर्जे, राहुल राठोड, संजय राठोड यांना सुपारी दिल्याचे आरोपीने कबूल केले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरूण सावंत व त्यांच्या पथकाने केली.

पोलीसांनी शंकर नारायण वडजे (वय-47 रा. सेवालालनगर तांडे, ता. उ. सोलापूर), राहुल चंदू राठोड (वय- 28 रा. मुळेगाव तांडा, ता. द. सोलापूर), संजय उर्फ भोजू राठोड (वय-28 रा. मुळेगाव) आणि मृत शैलेशचे वडील सुरेश सिद्धलिंग घोडके (वय-62 रा. मार्डी, ता. उ. सोलापूर) यांना अटक केली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरूण सावंत व त्यांच्या पथकाने केली.

You might also like