COVID-19 विरोधातील लढ्यात केंद्र सरकारच्या प्रयत्नांनी आणखीनच ‘फेमस’ झाले PM मोदी : सर्व्हे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसच्या संकटाच्या वेळी लोकप्रियतेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्ल्ड लिडर्सला मागे टाकत पहिल्या क्रमांकावर पोहचले आहेत. अमेरिकेतील ग्लोबल डेटा इंटेलिजेन्स कंपनी मॉर्निंग कन्सल्ट पॉलिटिकल इंटेलिजेन्सने एक रेटिंग यादी जाहीर केली आहे. कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर जगातील नेत्यांची कार्य करण्याची क्षमता आणि त्यांच्यावरील लोकांचा विश्वास लक्षात घेऊन हे रेटिंग जाहीर करण्यात आले आहे.

या रेटिंगमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अप्रुवल रेटिंग 7 जानेवारीला 76 टक्के होते तेच 21 एप्रिल रोजी वाढून 83 टक्के झाले आहे. दुसरीकडे आयएनएस -सीवोटर कोविड-19 ट्रॅकरने केलेल्या आणखी एका सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणाऱ्यांची संख्या वाढली आहे. या सर्वेक्षणानुसार 25 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या 76.8 टक्के होती आता ती वाढून 21 एप्रिल रोजी 93.5 टक्के झाली आहे.

मार्चच्या सुरुवातीला कोरोनाची प्रकरणे समोर येण्यास सुरुवात झाली. तेव्हा केंद्र सरकार घसरणाऱ्या अर्थव्यवस्थेची, अपयशी ठरलेली सर्वात मोठी बँके, दिल्लीतील प्राणघात दंगली आणि नागरिकत्व कायद्याविषयी टीकेची शिकार झाले होते. पंतप्रधान मोदी या विषयांवर नेहमीच खुलेपणाने बोलत होते. परंतु आता हे मुद्दे आणि केंद्र सरकार दोघेही देशाला साथीच्या आजारापासून मुक्त करण्याचा प्रयत्न करत आहेत. कोरोना संकटाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा मदत करणारा नेता म्हणून स्थापित झाली आहे. आणि ज्यावेळी भारताने हाइट्रोक्लोरोक्विन सारख्या औषधांच्या माध्यमातून इतर देशांना कोरनाशी लढण्यास मदत केली त्यावेळी त्यांची ही प्रतिमा झाली.

दरम्यान, पंतप्रधान मोदींसमोर सर्वात लोकप्रिय नेत्याचा टॅग राखण्यात अडचणी येऊ शकतात. कारण लॉकडाऊनमुळे कोट्यावधी लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागत आहेत. आणि बंदीमुळे लहान व्यापाऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात असलेल्या सरकारने जर या लोकांच्या समस्यांचा विचार केला नाही तर कदाचित सर्वात लोकप्रिय असल्याचा टॅक पंतप्रधान मोदींकडून काढून घेतला जाऊ शकतो.