तामिळनाडूत कावळ्यांना मारून विकलं, चिकनच्या स्टॉलवर ‘काका बिर्याणी’ अन् दोघं ‘गोत्यात’

रामेश्‍वरम : वृत्तसंस्था – कावळ्यांच्या मांसाचा खाण्यात वापर खरेतर तामीळनाडूतील जनतेला नवीन नाही. रस्त्यावरील अन्नपदार्थांमध्ये कावळ्याचे मांस काही वर्षांपासून तामीळनाडूत प्रचलित आहे. रन या कॉलीवूडमधील हिट सिनेमामध्ये आर. माधवनने तामीळ कॉमेडियन विवेकसह भूमिका रंगविली आहे. यात विवेकने रस्त्यावर असलेल्या एका गाडीवर अनवधानाने कावळ्याच्या मांसाची काका बिर्यानी खाल्ल्याचा प्रसंग आहे. विवेकने आपण काका बिर्यानी खाल्ल्याचे कळल्यानंतर केलेला मुद्राभिनय अगदी अफलातून असाच आहे.

त्यामुळे तामीळनाडूत राहणार्‍यांना कावळ्याच्या मांसाचे फारसे आश्‍चर्य नाही. मात्र अन्यत्र या विचाराने पण काहींना शिसारी येऊ शकते. रामेश्‍वरम शहरात चिकन म्हणून कावळ्याचे मांस विकल्याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना नुकतीच अटक केली आहे.

स्थानिक मंदिराला भेट दिलेल्या एका भाविकाने दिलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली. मंदिरात भाविकांनी ईश्‍वराला अर्पण केलेला तांदूळ कावळ्यांना खायला टाकून त्यांना बेशुद्ध केले जात असे. या प्रकरणाची पोलिसांनी माहिती घेतली असता हा तांदूळ दारूमिश्रित होता व त्यामुळे कावळे बेशुद्ध होऊन खाली पडत असत. त्यानंतर ही निर्दयी माणसे कावळ्यांचे मांस रस्त्यावरील फूडस्टॉलला विक्री करीत असत. महाग चिकनला पर्याय म्हणून कावळ्याच्या मांसाची विक्री होत असे.

कधी चिकनमध्ये कावळ्याच्या मांसाची भेसळ केली जाते. आता पोलीस असे भेसळयुक्त मांस विकणार्‍या फूडस्टॉल्सचा शोध घेत आहेत, जिथे ‘काका बिर्यानी’ विकली जात होती. तामीळनाडूत असे प्रकार नेहमी घडतातच. काही वर्षांपूर्वी 2016 मध्ये मांजराचे मांस कॅट बिर्यानीमध्ये वापरले जायचे. सामाजिक कार्यकर्त्यांनी नुकतेच एका मोहिमेदरम्यान चेन्नईतून अनेक मरणासन्न अवस्थेतील मांजरांची सुटका केली. यांचे मांस कॅट बिर्याणीसाठी वापरले जाणार होते. नारीकुरावा या तामीळनाडूतील भटक्या जमातीत मांजरांचे मांस हे पक्वान्न समजले जाते.