काय सांगता ! होय, ट्रॅक्टरमधून चक्क डॉक्टरच घेवुन गेले ‘कोरोना’ग्रस्ताचा मृतदेह, म्हणाले…

पोलिसनामा ऑनलाईन टीम – तेलंगणाच्या एका डॉक्टरांनी माणुसकी जपली आहे. डॉक्टर श्रीराम यांनी स्वतः ट्रॅक्टर चालवून एका कोरोना रुग्णाचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेला. संसर्ग होईल या भीतीने ट्रॅक्टरच्या ड्रायव्हरने नकार दिल्यानंतर त्यांनी स्वतः ट्रॅक्टर चालवण्याचा निर्णय घेतला.

कोरोनाग्रस्त रुग्णाचा पेडापल्ली जिल्ह्यातील एका सरकारी रुग्णालयात मृत्यू झाला. प्रशासनाकडून मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेण्यासाठी एक ट्रॅक्टर पाठवण्यात आला. पण ट्रॅक्टर चालकाने लागण होईल या भीतीने ट्रॅक्टर चालवण्यास नकार दिला. सर्व खबरदारी घेतली जाईल असे डॉक्टरांनी सांगितल्यानंतरही चालकाने नकार दिला. ही बाब पेडापल्ली जिल्ह्यात कोविडचा प्रसार रोखणाण्यासाठी पाळत ठेवणारे अधिकारी म्हणून कार्यरत असणार्‍या डॉ. श्रीराम यांना समजली. त्यांनी ट्रॅक्टर चालकाला समजावण्याचा प्रयत्न केला.

पण तो तयार झाला नाही. अखेर, डॉक्टर श्रीराम यांनीच पीपीई किट घालून ट्रॅक्टर चालवून मृतदेह अंत्यसंस्कारासाठी स्मशानात नेला. आधीच सहा तासांहून जास्त वेळ मृतदेह पडून होता. नातलग शांतपणे वाट बघत होते. रुग्णालयातील कर्मचार्‍यांनाही इतका वेळ मृतदेह तिथेच पडून असल्याचे वाइट वाटत होते. मी जे केले ते माझे कर्तव्य होते, अशी प्रतिक्रिया डॉक्टर श्रीराम यांनी दिली आहे.