१५०० रुपयांची लाच स्विकारताना पोलीस हवालदार अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – अदखलपात्र गुन्ह्यात कारवाई करण्यासाठी ३ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून दीड हजार रुपये लाच स्विकारताना पोलीस हवालदाराला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज पन्हाळा पोलीस ठाण्यात करण्यात आली. या कारवाईमुळे कोल्हापूर पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

सतीश बापूसो खुटावळे (वय-५३) असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. याप्रकरणी २२ वर्षीय व्यक्तीने कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे.
सतीश खुटावळे हा पन्हाळा पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार म्हणून कार्य़रत आहे. तक्रारदार व त्यांचे चुलत्यांच्यात घराचे जागेवरुन भांडण झाले होते. त्याबाबत तक्रारदार यांनी दिले फिर्यादीवरून त्यांचे चुलत्यांविरुद्ध पन्हाळा पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंद झाला होता.

त्या गुन्ह्यामध्ये आरोपीविरुद्ध कारवाई करण्यासाठी सतीश खुटावळे याने तीन हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदार यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिल्यानंतर पथकाने पंचासमक्ष पडताळणी केली. पडताळणी मध्ये खुटावळे याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. तसेच त्याने तक्रारदार यांना जमतील तसे पैसे देण्यास सांगितले. पथकाच्या अधिकाऱ्यांनी आज पन्हाळा पोलीस ठाण्यात सापळा रचला. तक्रारदाराकडून दीड हजार रुपये घेताना त्याला रंगेहाथ पकडण्यात आले.

ही कारवाई कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत आणि त्यांच्या पथकाने केली.सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्प लाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

आरोग्य विषयक वृत्त –

मानसिक आरोग्य जपण्यासाठी झोप आहे महत्वाची

कॅन्सरग्रस्तांच्या नातेवाईकांना हाफकिनमध्ये निवारा

लहान मुलांची उंची वाढण्यासठी करा हे नैसर्गिक उपाय

२१ जून जागतिक योग दिन : ” हे ” आहेत भारतातील सर्वात मोठे योगगुरू