धनंजय मुंडेंवरील आरोपाच्या प्रकरणात आमचा निष्कर्ष ‘बरोबर’ होता – शरद पवार

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे आपली लेक खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह कोल्हापूर दौर्‍यावर आले आहेत. त्यांनी धनंजय मुंडे प्रकरणावर पत्रकारांशी बोलताना त्यांनी आमचा निष्कर्ष बरोबर होता, हे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचे सांगितले. सामजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधातील बलात्काराची तक्रार रेणु शर्मा हिने मागे घेतली आहे.

याविषयी शरद पवार म्हणाले की, सुरुवातीला हे प्रकरण आपल्यासमोर आल्यावर ते गंभीर असल्याचे आपण म्हटले होते. त्यानंतर आमच्यापुढे काही माहिती, कागदपत्रे आल्यावर त्यात आणखी खोलात जाऊन चौकशी करण्याची गरज असल्याचा आमचा निष्कर्ष होता. पोलीस चौकशीत काय माहिती येते, हे पाहून निर्णय घेण्याचा आम्ही निर्णय घेतला. आता तक्रार मागे घेतल्याचे वाचनात आले. तेव्हा आमचा निष्कर्ष बरोबर होता, असे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.

हनी ट्रॅप ही महाराष्ट्राची संस्कृती नाही : सुप्रिया सुळे
हनी ट्रॅप ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी सांगितले. कोल्हापूरात अंबाबाईच्या दर्शनासाठी जाण्यापूर्वी त्यांनी शासकीय विश्रामधामवर पत्रकारांशी बोलत होत्या. खासदार सुळे म्हणाल्या, कुणाच्या व्यक्तिगत आयुष्यात काय घडले हे शोधण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. त्यामुळे हा विषय आता पुरे झाला. राज्यासमोर त्याहून जास्त महत्वाचे प्रश्न आहेत. सर्वांनी त्यावर लक्ष द्यावे.