छप्पर पेटविल्या प्रकरणी दोघांना सक्त मजुरीची शिक्षा

नगर : पोलीसनामा ऑनलाईन

कर्जत येथील बजरंगवाडी शिवारात राहत्या छपराला आग लावून पेटवून दिल्याप्रकरणी दोघा आरोपींना ३ महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा व प्रत्येकी पंचवीस हजाराचा दंड ठोठावला आहे, तसेच दंड न भरल्यास एक महिना साधी कैद न्यायालयाने सुनावली आहे.

बापू बाबीर गोयकर (रा.मलठण ,ता.कर्जत ), राजू मोतीराम गोयकर (रा.पिंपरखेड,ता.कर्जत ) असे शिक्षा झालेल्या आरोपींचे नावे आहेत. या प्रकरणी मोतीराम एकनाथ गोयकर यांनी फिर्याद दिली होती. आरोपीकडून वसूल करण्यात येणाऱ्या दंडाच्या रकमेतून २५००० रुपये फिर्यादीस देण्याचे आदेश न्यायाधीशांनी दिले आहेत.

काय होती घटना – मोतीराम एकनाथ गोयंकर हे बजरंगवाडी शिवारात एका छपरामध्ये राहत होते. आरोपींनी संगनमत करून बापू गोयकर याने त्याचा पियागो रिक्षा नोटरी करून फिर्यादीचा मुलगा बाबासाहेब गोयकर यास विकलेला होता. तो रिक्षा १०/०१/२०१३ रोजी दोन्ही आरोपी घेऊन जाऊ लागले असता फिर्यादी व मुलगा बाबासाहेब यांनी विरोध केला असता, त्यांना आरोपीने धक्का बुक्की केली. यानंतर राजू गोयंकर याने मोतीराम यांच्या राहत्या छपराला माचीसच्या काडीने आग लावून छप्पर पेटवून दिले. तसेच मोतीराम आणि कुटुंबियांना शिवीगाळ व दमदाटी केली. गवताचे आणि लाकडाचे छप्पर असल्याने ते काही मिनिटात जळून खाक झाले. यामध्ये असणारे धान्य ,जीवनोपयोगी सामान, व इतर साहित्य असे २५००० हजारांचे नुकसान झाले. यानंतर फिर्यादीने कर्जत पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध तक्रार नोंदवली होती.

या प्रकरणाचा निकाल अहमदनगर जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत सातभाई यांनी दिला. तर अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अनिल ढगे यांनी खटल्याच्या कामकाजात मदत केली.