मिरजमध्ये ५० तोळे सोन्याच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला

मिरज : पोलीसनामा ऑनलाईन
मिरजमधील गेस्ट हाऊस समोर असणा-या विवेकानंदनगरमधील एका बंद बंगल्यात चोरट्यांनी चोरी करुन पंधरा लाख रुपये किंमतीचे ५० तोळे सोन्याचे दागिने चोरु नेले. हा प्रकार सोमवारी (दि.२८) दुपारी उघडकीस आला.

श्रीकुमार श्रीधरण यांनी याप्रकरणी मिरज पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे.

श्रीधरण यांचा विवेकानंदरनगरमध्ये बंगला आहे. मागील आठ दिवसांपासून ते नातेवाईकांच्याकडे गेले होते. या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी बंगल्याच्या टेरसच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरात असणारी तिजोरी चोरट्यांनी बेडवर ठेऊन फोडली. तिजोरीतील कर्णफुले, ब्रासलेट, अंगठी, चेन असे सुमारे पन्नास तोळ्यांचे सोन्याचे दागिने आणि पंधरा हजार रुपयांची रोकड असा एकूण पंधरा लाख लुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. सोमवारी दुपारी घरातील काहीजण घरी आले असता हा प्रकार उघडकीस आला.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपाधीक्षक अशोक विरकर यांनी घटनास्थळी  भेट देऊन पाहणी केली. चोरट्यांचा शोध घेण्याचे आदेश त्यांनी शहर पोलिसांना दिले आहेत.