१ हजार रुपयांची लाच स्विकारताना नगररचना विभागातील लिपिक अ‍ॅन्टी करप्शन च्या जाळ्यात

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन – जागेची कागदपत्रे देण्यासाठी १ हजार रुपयांची लाच स्विकारणाऱ्या भाईंदर महानागरपालिकेतील नगररचना विभागातील लिपिकाला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई नगररचना विभागात आज (शुक्रवार) दुपारी चारच्या सुमारास करण्यात आली. एसीबीच्या या कारवाईमुळे महानगरपालिकेत खळबळ उडाली आहे.

प्रशांत घनश्याम कोळी असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या लिपिकाचे नाव आहे. याप्रकरणी ३२ वर्षीय व्यक्तीने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकाडे तक्रार दिली आहे. तक्रारदार यांची मीरा भाईंदर मनपा येथे जागा आहे. तक्रारदार यांनी भाईंदर महानगरपालिकेतील नगररचना विभागात जागेच्या नवीन सर्वेचा नंबरचे कागदपत्रे मिळावीत यासाठी अर्ज केला होता. या कागदपत्रांची झेरॉक्स कॉपी तक्रारदार यांना देण्यासाठी कोळी याने एक हजार रुपयांची लाच तक्रारदाराकडे मागितली.

तक्रारदार यांनी लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पथकाने तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी केली असता कोळी याने लाचेची मागणी करुन ती स्विकारण्याचे कबुल केले. आज दुपारी महानगरपालिकेतील नगररचना विभागात पथकाने सापळा रचला. कोळी याला तक्रारदार यांच्याकडून एक हजार रुपये स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.
सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्प लाईन क्रमांकावर संपर्क साधावा.