10 हजार रुपयांची लाच स्विकारताना मुख्याध्यापक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

भंडारा : पोलीसनामा ऑनलाइन – बारावीचा १७ नंबरचा फॉर्म भरण्यासाठी दोन विद्यार्थ्यांकडून १० हजार रुपयांची लाच स्विकारताना कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकासह शिक्षकाला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई तुमसर तालुक्यातील लोहारा येथील रतीराम टेंभरे कनिष्ठ महाविद्यालयात आज करण्यात आली. या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. मुख्याध्यापक शिवनारायण जयराम राणे (वय ५४) आणि सहाय्यक शिक्षक बाबुलाल मोतीराम पटले असे लाचखोर शिक्षकांची नावे आहे.

तक्रारदार विद्यार्थ्याने आणि त्याच्या मित्र २०१६-१७ मध्ये दहावी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांना अकरावीत प्रवेश घेता न आल्याने त्यांनी १७ नंबर फॉर्म भरून बारीवी करण्यासाठी रतीराम टेंबरे महाविद्यालयातील मुख्याध्यापकांची भेट घेतली. त्यावेळी मुख्यध्यापक राणे याने दोघांना प्रत्येकी पाच हजार रुपये लागतील असे सांगून दोघांकडे १० हजार रुपयांची लाच मागीतली. याची तक्रार भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केल्यानंतर पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली. आज महाविद्यालयात सापळा रचला असता दोन विद्यार्थ्यांकडून दहा हजार रुपयांची लाच स्विकारताना दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्याविरुद्ध आंधळगाव पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडेकर, अप्पर पोलीस अधीक्षक राजेश दुध्दलवार यांच्या मार्गदर्शनात उपअधीक्षक महेश चाटे, पोलीस निरीक्षक योगेश पारधी, अश्विन गोस्वामी, पराग राऊत यांनी केली.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

आरोग्यविषयक वृत्त –