रामटेक मतदार संघात स्ट्राँग रुममधून CCTV चे रेकॉर्डिंग असलेले DVR आणि TV संच चोरीला

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – रामटेक लोकसभा मतदार संघात येणाऱ्या उमरेड विधानसभा मतदार संघातलया मतदान सुरक्षा केंद्रांतून सीसीटिव्हीचे असलेले डीव्हीआर आणि टीव्ही संच चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मात्र ईव्हीएम मशीन आणि बाकीचे महत्वपूर्ण साहित्य आधीच नागपुरात पोहचले केल्याने चोरीला गेलेले साहित्य महत्वपूर्ण नसल्याचा निर्वाळा निवडणूक निर्णय आधिकऱ्यांनी दिला आहे.

याबाबत बोलताना निवडणूक निर्णय अधिकारी म्हणाले की, ” स्ट्रॉंगरूममध्ये सीसीटीव्ही रेकॉर्डिंग असलेले डीव्हीआर आणि दोन टीव्ही संच आणि इतर साहित्य ठेवलेले होते. त्यातूनच हे साहित्त्य चोरीला गेले आहे. त्याबाबतचे पत्र स्थानिक पोलीस स्टेशनला देण्यात आले आहे. संबंधित साहित्य चोरीला गेल्यामुळे निवडणूक अथवा मतमोजणीच्या प्रक्रियेला कोणतीच बाधा पोहचणार नाही, असा निर्वाळा अप्पर जिल्हाधिकारी श्रेकांत फडके यांनी यावेळी दिला.

रामटेक लोकसभा निवडणुकीसाठी उमरेड विधानसभा क्षेत्रात एकूण ३८४ मतदार केंद्र होते. या संपूर्ण मतदान केंद्रासाठी उमरेड येथील शासकीय औद्योगिक संस्थेची स्ट्राँग रुमसाठी निवड करण्यात आली होती. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार या सुरक्षा केंद्रावर करडी नजर ठेवण्यासाठी आणि साहित्य सुरक्षित असावे, यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. साधारणत: मार्च अखेरपासूनच येथील स्ट्राँग रुमवर एका पोलीस अधिकाऱ्याच्या नेतृत्वात २४ तास कडेकोट पोलीस बंदोबस्तही तैनात होता. सदर मतदान सुरक्षा केंद्रावरून सीसीटीव्ही कॅमेऱ्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणारे डीव्हीआर आणि टीव्हीसंच चोरीला गेले आहेत.