जतमध्ये वटपौर्णीमेच्या दिवशी चोरट्यांचा महिलेच्या दागिन्यांवर डल्ला

जत : पोलीसनामा ऑनलाईन

वट पौर्णिमेनिमित्त वड पूजेसाठी निघालेल्या एका महिलेच्या गळ्यातील अडीच लाख रुपयांचे सात तोळ्यांचे दागिने चोरट्यांनी धूम स्टाईलने लंपास केले. भर दिवसा व पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावरच हा प्रकार घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. बुधवारी (दि.२७) दुपारी हा प्रकार घडला.

उमा विष्णूपंत साळे (रा. मंगळवार पेठ) या त्यांच्या जाऊबाईसोबत प्रांत कार्यालय परिसरात असलेल्या वडाची पूजा करण्यासाठी जात होत्या. महसूल कॉलनीतील आर. आर. कॉम्प्यूटरजवळ मोटारसायकलीवरून आलेल्या दोन तरूणांनी धूम स्टाईलने त्यांच्या गळ्यातील दागिन्यांना हिसडा मारला. काही समजायच्या आतच चोरटे मोटारसायकलीवरून विद्यानगरच्या दिशेने वेगात निघून गेले. पाच तोळ्याचे मंगळसूत्र व दोन तोळ्यांचा राणीहार असा अडीच लाख रूपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.

[amazon_link asins=’B07428Y8PM’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’61e068e0-7a27-11e8-a552-f728e842943d’]

मोटारसायकलीवरून आलेल्या दोघांनी तोंडास रूमाल बांधले होते. एकाच्या अंगात करड्या तर दुसर्‍याच्या अंगात नीळ्या रंगाचा टी. शर्ट होता. युनिकॉर्न मोटारसायकलीचा त्यांनी चोरीसाठी वापर केला. दागिने चोरीस गेल्यानंतर उमा व त्यांच्या सोबत असलेल्या महिलांना आरडा-ओरड केली. मात्र चोरटे अतिशय वेगाने निघून गेले.

प्रांत कार्यालय, पोलीस ठाणे या परिसरात महसूल कॉलनी आहे. अशा गर्दीच्या ठिकाणी दिवसाढवळ्या चोरीचा प्रकार झाल्याने शहरात खळबळ माजली आहे. वटपूजेस जाणार्‍या महिलांमध्ये भीतीचे वातावरण होते. चोरीबाबत जत पोलीसांत गुन्हा दाखल झाला आहे.