राज्यातील पहिली ‘लोकराज्य’ उर्दू शाळा

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – शासनाचे मुखपत्र ‘लोकराज्य’ हे लोकप्रिय मासिक देशातील सर्वाधिक खपाचे मासिक म्हणून मान्यता पावले आहे. राज्य शासनाच्या विविध योजना आणि निर्णय, त्यांची अंमलबजावणी यांची अधिकृत आणि अचूक माहिती पुरविणारे व तब्बल 5 लाख 17 हजार 68 इतका अधिकृत खप असणारे हे एकमेव शासकीय मासिक आहे. समाजातील सर्वच घटकांना उपयुक्त असणारे हे मासिक आहे. विशेष म्हणजे हे मासिक मराठी भाषेसह इंग्रजी, उर्दू , हिंदी आणि गुजराती भाषेतही प्रकाशित होते.

जिल्हयात या मासिकाबाबत जिल्हा माहिती कार्यालयामार्फत विविध प्रकारे जनजागृती सातत्याने केली जाते. यास प्रतिसाद देताना जिल्हयातीलच नव्हे तर राज्यातील पहिली लोकराज्य अल्पसंख्याक संस्था होण्याचा बहुमान मौलाना अबुल कलाम आझाद शिक्षण संस्थेने मिळविला आहे. या संस्थेतील इ.7 वी ते 10 वी च्या सर्व विद्यार्थ्यांनी उर्दू लोकराज्यचे सभासदत्व स्वीकारले आहे. त्यामुळे ही शाळा आता जिल्हयातील तसेच राज्यातील पहिली उर्दू लोकराज्य शाळा म्हणून ओळखली जाणार आहे.

मौलाना अबुल कलाम आझाद शिक्षण संस्था स्वच्छता अभियान, बेटी बचाव बेटी पढाओ मोहीम, मतदार जनजागृती, अल्पसंख्याक समाजात शिक्षणासाठी जनजागृती, पूरग्रस्तांसाठी मदत फेरी असे विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यातही आघाडीवर आहे.

या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक शिक्षण संस्थाचालक संघाचे जिल्हाध्यक्ष हाफीझ अलिमोद्दीन आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे जिल्हा माहिती कार्यालयातर्फे अभिनंदन करण्यात आले असून दि.17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम वर्धापनदिनानिमित्त आयोजित मुख्य सोहळयात पालकमंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देवून या संस्थेचा सन्मान करण्यात येणार आहे.

You might also like