रेल्वेमध्ये प्रवाशांना लुटणार्‍या चौघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन
रेल्वेमध्ये प्रवास करणार्‍यांकडील मोबाईल, बॅगा आणि इतर मौल्यवान वस्तु चोरणार्‍या चौघांना पुणे लोहमार्गच्या स्थानिक गुन्हे शाखेेने अटक केली आहे. त्यांच्याकडून एकुण 1 लाख 34 हजार 900 रूपयाचा ऐवज जप्‍त करण्यात आला आहे. त्यामध्ये 17 मोबाईल आणि 5 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दागिन्यांचा समावेश आहे.
विकी बबनराव लांडगे (21, रा. मुकुंदवाडी, संजयनगर, औरंगाबाद. सध्या रा. पुणे), राहुल राजु शिंदे (19, रा. साईबाबा कॉर्नर, कोपरगाव, जि. अहमदनगर. सध्या रा. पुणे),  अशोक बाबु लहाने (22, रा. शिंदेमळा, सावेडी, जि. अहमदनगर, सध्या रा. पुणे) आणि दिपक भगवान खाजेकर (30, रा. हारेगाव, ता. श्रीरामपुर, जि. अहमदनगर. सध्या रा. पुणे फिरस्ता) अशी अटक केलेल्यांची नावे आहे. फिर्यादी दिलखुश कुमार महेश पासवान (22, रा. दरभंगा, बिहार) हे दि. 8 ऑगस्ट रोजी पहाटे एक वाजण्याच्या सुमारास पुणे एक्सप्रेसने बोगी नं. एस 8 मधून प्रवास करून पुणे रेल्वे स्टेशनवर उतरत असताना चोरटयांनी गर्दीचा फायदा घेवुन त्यांचा दहा हजार रूपये किंमतीचा मोबाईल लंपास केला होता. आरोपी हे कोपरगाव येथुन अहमदनगर, दौंड आणि पुणे रेल्वे स्टेशन येथे येवुन प्रवाशांकडील मोबाईल, बॅगा आणि इतर ऐवज चोरून नेत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अनिल दबडे यांना मिळाली होती. पोलिस अधिक्षक तुषार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) पोलिस निरीक्षक अनिल दबडे, उपनिरीक्षक बबन गायकवाड, पोलिस हवालदार अनिल दांगट, पोलिस नाईक अमरदिप साळुंके, संतोष चांदणे, जनार्दन गर्जे, निलेश बिडकर, राजेश ककोकाटे, ज्ञानेश्‍वर सुर्यवंशी, पवन बोराटे, संदिप पवार, भिसे, गाडे, खोत आणि चालक जगदीश सावंत यांच्या पथकाने अधिक माहिती काढून आरोपींना अटक केली. त्यांच्याकडे सखोल तपास केला असता त्यांनी गर्दीचा फायदा घेवुन रेल्वे प्रवाशांकडील मोबाईल, बॅगा आणि इतर ऐवज चोरत असल्याची कबुली दिली.
आरोपींकडून 17 मोबाईल आणि 5 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन असा एकुण 1 लाख 34 हजार 900 रूपयाचा ऐवज जप्‍त करण्यात आला आहे. गुन्हयाचा अधिक तपास लोहमार्ग पोलिसांची स्थानिक गुन्हे शाखा करीत आहेत.