रेती व्यावसायिकाची हत्या, ५ जणांविरुद्ध गुन्हा

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन – धामगणगाव मार्गाकडून बुलेटने घरी जाणाऱ्या रेती व्यावसायिकावर धारदार शस्त्राने वार करून हत्या केली. व्यावसायिक स्पर्धेतून कट रचून ही हत्या करण्यात आली. धामणगाव रोडवरील चांदोरेनगरमध्ये ही घटना घडली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका आरोपीला चौकशीसाठी ताब्यात घेतले. उर्वरित मारेकऱ्यांच्या शोधासाठी पोलिसांची विविध पथके रवाना झाले आहे.

सचिन किसन मांगुळकर (३६) रा. चांदोरेनगर धामणगाव रोड असे मृतकाचे नाव आहे. किरण खडसे, सचिन महल्ले रा. विठ्ठलवाडी, बाबू तायडे रा. गौतमनगर यवतमाळ, भीमा खाडे, गजानन रामकृष्ण कुमरे रा. मोहा अशी आरोपींची नावे आहे. मृतक सचिन मांगुळकर हा रेतीचा व्यवसाय करीत होता. सरत्या वर्षातील हा ५५ वा खून आहे.

आरोपी त्याच्यासोबत रेतीचा व्यवसाय करीत होते. परंतु त्यांच्यामध्ये मागील काही दिवसांपासून व्यवसायातून वाद सुरू होता. २८ डिसेंबरला रेतीच्या व्यवसायातून आरोपी भीमा खाडे, गजानन कुमरे याच्यासोबत जोरदार भांडण झाले होते. २९ डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास सचिन मांगुळकरच्या मोबाइलवर फोन करून बातचित केली. त्यानंतर मृतकाने मी मोहा फाट्यावर जावून येतो, असे सांगून आपल्या बुलेटने घरून गेला होता. रात्री ९ वाजताच्या सुमारास मदनकर यांच्या घराजवळ आरोपी भीमा खाडे, गजानन कुमरे यांनी धारदार शस्त्राने सचिन मांगुळकरचा गळा, गाल, कपाळ व डोक्यावर सपासप वार केले. जीव वाचविण्याच्या आकांताने किंचाळत सचिन रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला.

स्टेट बँक चौकातून पाणी पुरी खावून घराकडे परत जात असताना मृतकाची पत्नी व मुलीच्या हा प्रकार निदर्शनास आला. त्यामुळे घटनास्थळावरून मारेकरी भीमा व गजाननने तेथून पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप, शहरचे ठाणेदार प्रकाश शेळके यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, टोळी विरोधी पथक, शहर डीबी पथकासह अन्य पथकाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठले. रक्ताच्या थारोळ्यात पडून असलेल्या सचिन मांगुळकरला रुग्णवाहिकेने येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणी करून त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. शहर पोलिसांनी पाचही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला.