वाघोलीत बोगस पोलिस अधिकार्‍याच्या लोणीकंद पोलिसांनी आवळल्या मुसक्या

वाघोली : पोलीसनामा ऑनलाइन – पोलीस अधिकारी असल्याचे सांगून नागरिकांना व दुकानदारांना दम देणे, मारहाण करून दहशत पसरविणाऱ्या भामट्या पोलीस अधिकाऱ्याच्या मुसक्या लोणीकंद पोलिसांनी आवळल्या आहेत. वाघोली येथील बाईफ रोड परिसरातील जागरूक नागरिकांकडून माहिती मिळाल्यानंतर लोणीकंद पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. याप्रकरणी त्याच्यावर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हर्षद आनंद सपकाळ (वय, २४) असे अटक करण्यात आलेल्या तोतया पोलिसाचे नाव आहे.

याबाबतीत लोणीकंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघोली येथील बाईफ रोड परिसरातील व्हाइटस्टोन सोसायटीमध्ये राहणाऱ्या हर्षद सपकाळ हा स्वतःपोलीस अधिकारी असल्याचे भासवून बाईफरोड परिसरातील दुकानदार, नागरिकांमध्ये लॉकडाऊनच्या अनुषंगाने मारहाण करीत दहशत निर्माण करीत होता. त्याच्या चारचाकी सेलेरीओ (एमएच १५ आरजी ९२३२) गाडीमध्ये पोलीस अधिकाऱ्याची टोपी व काठी असल्याने नागरिकही त्याला घाबरत होते.त्याचबरोबर काही दुकानदारांकडून दमबाजी करत पैसे न देता साहित्य नेत होता. आठवडाभरापासून असे प्रकार सुरु असल्याने स्थानिक तरुणांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात कारची व अधिकाऱ्याबाबत चौकशी केली असता असा कोणताही अधिकारी कार्यरत नसल्याचे समजले. निखिल मेदनकर,ओकार तुपे या तरुणांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांनी स्वतःयाबाबत माहिती घेऊन काही पोलीस त्याच्यामागावर ठेवले होते.

पोलीसानी तांत्रिक कौशल्याच्या आधारे त्याचा पाठलाग करून शिताफीने पकडले.त्याच्याकडील पोलीस अधिकाऱ्याची काठी, टोपी व गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याकामी लोणीकंद पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे,समीर पिलाणे,दत्तात्रय काळे, बाळासाहेब तनपुरे यांनी रात्रीच्या वेळी पाठलाग करत शिताफीने पकडले असून या भामट्या पोलीस अधिकाऱ्यावर यापूर्वीच नाशिक व जालना येथील बलात्कार व फसवणुकीचा गुन्हा दाखल असल्याचे लोणीकंद पोलिसांनी सांगितले.

पोलीस अधिकारी असल्याचे सांगून ज्या नागरिकांची फसवणुक झाली आहे त्यांनी लोणीकंद पोलिसांशी संपर्क साधावा.