अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याचे लोकार्पण करा, अन्यथा आम्ही करू

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन – उदगीर येथील नांदेड रोडवर असलेल्या लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक येथे नगर परिषदेतर्फे चबुतऱ्याचे व चौकाचे सुशोभिकरण करण्यात आले आहे. याठिकाणी नगर परिषदेतर्फे चार महिन्यांपूर्वी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा उभा करण्यात आला आहे. मात्र या पुतळ्याचे अद्यापही लोकार्पण न करता कपड्यामध्ये झाकून ठेवण्यात आला आहे. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे लोकार्पण उदगिरात होणाऱ्या मराठवाडा साहित्य संमेलनापूर्वी करावे, अन्यथा समाजातर्फे पुतळ्याचे लोकार्पण करण्याचा इशारा उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात देण्यात आला आहे.

उदगीरमध्ये दि. २३ ते २५ डिसेंबर दरम्यान मराठवाडा साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने या साहित्य संमेलनाचे निमित्ताने अनेक साहित्यिक मंडळी उदगिरात येत आहेत. अशा वेळी लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा झाकून ठेवणे योग्य नाही. पुतळ्याला झाकण्यात आलेला कपडाही फाटत चालला आहे. त्यामुळे या साहित्य संमेलनाच्या पूर्वी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा झाकून ठेवलेल्या पुतळ्याचे तात्काळ लोकार्पण करण्यात यावे. जर प्रशासनाकडून या पुतळ्याचे लोकार्पण करण्यास टाळाटाळ करण्यात आल्यास समाजबांधवातर्फे लोकार्पण करण्यात येईल, असा इशारा उपजिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यात आलेल्या निवेदनात देण्यात आला असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र शिंदे यांनी सांगितले.

निवेदनावर रिपाइंचे (आ.) जिल्हाध्यक्ष देविदास कांबळे, मातंग क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष बन्सीलाल कांबळे, दिलीप कांबळे, ॲड. रुक्मीणबाई सोनकांबळे, जनार्धन गडकर, ॲड. मारोती चव्हाण, वर्षा कांबळे, बाबूराव सूर्यवंशी, नामदेव बामणे, राम गिलचे, श्रीधर धोंगडे, बळीराम कांबळे, बालाजी गवारे, मारोती गुंडिले, काशिनाथ कांबळे, बापूसाहेब कांबळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

आगामी निवडणुकीत आमची ताकद दाखवू : धनगर समाजाचा इशारा