जेजुरीत गुरुकुल इंग्लिश स्कूल मध्ये अवकाश निरीक्षण केंद्राचे उद्घाटन

जेजुरी (ता . पुरंदर) : पोलीसनामा ऑनलाइन – येथील गुरुकुल इंग्लिश स्कूल येथे कै. आनंदीबाई वामन खंडागळे – पुंडे यांच्या स्मरणार्थ आधुनिक अवकाश केंद्र सुरू करण्यात आले. केंद्राचे उद्घाटन पुणे येथील फर्ग्युसन कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ. के. व्ही. वाघ व लायन्स क्लबचे गव्हर्नर ओमप्रकाश पेठे यांच्या हस्ते करण्यात आले. याबाबत जेजुरी देवसंस्थानचे माजी प्रमुख विश्वस्त डॉ. प्रसाद खंडागळे यांनी माहिती दिली.

जेजुरी येथील गुरुकुल विद्यालयात सोमवारी (दि . ११ ) आधुनिक अवकाश केंद्र सुरू केले. या वेळी लायन्स क्लबचे पदाधिकारी अभय शास्त्री, हेमंत नाईक, रामकृष्ण मठाचे स्वामी एकानंद, सहकारनगर पुणेच्या अध्यक्षा संध्या नारके, नवचैतन्याचे बिंदुमाधव मेंडजोगे, डॉ. विशाल कुंभारे, प्राचार्य बाळासाहेब झगडे, प्रकाश नार्के, विजय सोनावणे, डॉ. विपुल अभ्यंकर, शरद पवार, राहुरी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. देशमुख, विलास लोंढे, कश्यप साळुके, प्रकाश खडे, नंदू गोसावी आदी उपस्थित होते.

या अवकाश निरीक्षण केंद्रात दुर्बिणीच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी फायदा होणार असल्याचे डॉ. वाघ यांनी सांगितले. मुलांना केंद्राचा फायदा होऊन ग्रामीण भागातून अवकाश शास्त्रज्ञ तयार होतील , असे ओमप्रकाश पेठे म्हणाले. या वेळी अवकाश शास्त्रज्ञ हेमंत नाईक, स्वामी एकानंद यांनी मार्गदर्शन केले.

जेजुरीच्या खंडोबा देवाच्या गडाच्या पायथ्याजवळील गुरुकुल विद्यालयाच्या जागेत पौराणिक काळात सप्तर्षी ऋषींचा आश्रम होता. त्यामुळे या अवकाश केंद्राला सप्तर्षी नाव देण्यात आल्याचे डॉ. प्रसाद खंडागळे यांनी सांगितले. या वेळी डॉ. कुंभारे यांनी लिहिलेल्या ओळख खगोलशास्त्राची, या चिमण्यांनो परत फिरा रे, या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. या आधुनिक अवकाश केंद्राचा लाभ पुरंदर तालुक्यातील विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आव्हान प्राचार्य बाळासाहेब झगडे यांनी केले.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like