उस्मानाबादमध्ये तपासणीसाठी राज्यातील 131 व्या लॅबचं उद्घाटन, ‘कोरोना’च्या टेस्टसोबतच संशोधन व्हावं : मुख्यमंत्री ठाकरे

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन  –  कोरोना पुर्वी डेंग्यु,स्वॉईन फ्लु, एचआयव्ही या सारखे आजार आले. त्याचवेळी आपण संकट ओळखू शकलो नाही, सर्व जगाला या संकटाने सध्या ग्रासले आहे. परंतू संकटात सुध्दा न डगमगता वाटचाल करणे आवश्यक आहे. पुर्वी राज्यात फक्त दोन लॅब होत्या. आज उस्मानाबाद येथील १३१ व्या लॅबचे उदघाटन होत आहे. या लॅबमध्ये कोरोना तपासणी सोबतच संशोधन ही व्हावे, त्यासाठी संशोधन विभाग सुरू करावा, असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.

उस्मानाबाद येथील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्रात १ कोटी १० लाख रुपये खर्च करून राज्यातील पहिली वैद्यकीय क्षेत्र विरहीत प्रयोग शाळेची उभारणी जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे, सीनेट मेंबर संजय निंबाळकर यांच्या पुढाकारातून व जिल्हयातील सहकारी संस्था यांच्या मदतीतुन उभा राहिल्याबद्दल आरोग्यमंत्री राजेश टोपे व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कौतुक केले. पुढे बोलताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यातील कोरोनामुळे होणारे मृत्यू दर कमी करण्याचे प्रयत्न चालू आहेत. त्यासाठी टास्क फोर्स ची स्थापना करण्यात आली आहे. गावा-गावात कोरोना दक्षता समिती नेमणे आवश्यक आहे. जे पाठ्यपुस्तकात नाही ते आपल्याला शिकण्याचे प्रयत्न करायचे आहेत. कोरोनाने आपला जीवन कसे जगावे, हे शिकवले आहे. राज्यात सतत होत असलेल्या लॉकडाऊन चा उल्लेख करून मुख्यमंत्री ठाकरे यांनी एकमेकांपासून दुर राहिल्यामुळे संसर्ग वाढत नाही, असे वाटत असतानाच कोरोना सोबत जगणे आवश्यक झाले आहे. कोरोनाचे पीक येते, नंतर उतरते त्यामुळे परत कोरोना येत नाही, असे म्हणून गाफील राहू नका, जोपर्यंत कोरोनावर औषध सापडत नाही, तोपर्यंत जनतेला सोबत घेऊनच राज्याला पुढे घेवुन जायचे आहे. जिल्हा प्रशासनाने यासाठी जनजागृती करने महत्वाचे आहे. यानिमित्ताने जगातील सर्वोत्तम आरोग्य सुविधा संपन्न महाराष्ट्र राज्य आपल्याला घडवायचा आहे, असे ही मुख्यमंत्री म्हणाले.

महाराष्ट्रात १३१ लॅब झाल्यामुळे दररोज ५० हजार कोरोना टेस्टींग होत आहेत. आतापर्यंत राज्यात १६ लाख ५९ हजार ३३७ टेस्टींग झाल्या आहेत. त्यामधुन ३ लाख ३७ हजार कोरोना रूग्ण सापडले आहेत. त्यामुळे रूग्णांची माहिती लपविली जात आहे. हा आरोप खोटा आहे, असे सांगून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रॅपिंड अॅटीजेन किट्स च्या माध्यमातून ८५ हजार ८०७ टेस्ट झाल्या आहेत. उस्मानाबाद येथील लॅब उभारणीमध्ये संजय निंबाळकर यांनी पुढाकार घेऊन दानशूर लोकांनी जी मदत केली. त्या बद्दल ना.टोपे यांनी आभार मानले.

दरम्यान पालकमंत्री शंकरराव गडाख यांचेही भाषण झाले. यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर , आमदार कैलास पाटील, जिल्हाधिकारी दिपा मुंधोळ-मुंडे, मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रमोद येवले, जि.प.अध्यक्ष अस्मिता कांबळे जि.प.चे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते, जिल्हा आरोग्य अधिकारी हणमंत वडगावे, एनसाईचे बी.बी.ठोंबरे, उस्मानाबाद जनता बँकेचे चेअरमन ब्रीजलाल मोदाणी, नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, जिल्हा प्रशासनाचे विविध अधिकारी , पञकार, समाजातील मान्यवर मंडळी उपस्थित होते.