वयाच्या चाळीशीत आहात ? निरोगी राहण्यासाठी काय खावं आणि काय टाळावं ? जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन टीम : वयाची चाळीशी ओलांडल्यानंतर शरीरात अनेक बदल होतात आणि शरीरात काही समस्याही जाणवू लागतात. शरीरावर मेद जमा होणं, शरीर बेढब दिसणं, हृदयरोग, उच्च रक्तदाब, मधुमेह, संधीवात असे आजारही डोकं वर काढू लागतात. वयाची चाळीशी पार केल्यानंतर आहारात बदल करणं खूप गरजेचं असतं. आहारात नेमका कोणत्या पदार्थांचा समावेश करावा आणि कोणते पदार्थ टाळावेत याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.

कोणते पदार्थ खावेत आणि टाळावेत ?
1) चयापचयाची क्रिया वाढवा आणि फायबरयुक्त अन्न खा – आपल्या आहारात सर्व प्रकारच्या धान्याचा समावेश असावा. यामुळं हृदय आणि धमन्यांच्या भिंती घट्ट होतात. तसंच त्या कडक होतात. परिणामी रक्तदाब कमी होण्यास मदत होते. मैद्यापासून तयार केलेले पदार्थ, खास करून ब्रेड खाणं टाळावं. त्याऐवजी ब्राऊन राईस, ओट्स यांचा आहारात समावेश करावा. फायबरयुक्त पदार्थ खावेत त्यामुळं वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. कोशिंबीर, पालक, गाजर, काकडी, टोमॅटो, भोपळी मिरची, ऑलिव्ह, मनुका, संत्री आणि स्ट्रॉबेरी यांचा आहारात समावेश करावा. या घटकांमध्ये फायबर, पोटॅशियम, अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी असतात. त्यामुळं त्वचा लवचिक राहण्यास आणि सुर्याच्या हानिकारक अतिनील किरणांपासून संरक्षण करण्यास मदत होते.

2) मीठाचा वापर कमी करा – आहारात मीठाचा वापर हा मर्यादित असावा. कारण मीठाचा रक्तदाबावर नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळं मीठ कमी खावं. मीठाच्या अतिसेवनामुळं हृदय, मुत्रपिंड, रक्तवाहिन्या आणि मेंदूवर ताण येतो. तळलेले, प्रक्रिया केलेले, जंक आणि मसालेदार पदार्थ देखील टाळावेत. मीठ असलेले चीज, फ्रोझन फूड आणि पिझ्झा यांचंही सेवन टाळावं. मीठ आणि साखर आहारातून दूर करावी.

3) गोड पदार्थ नियंत्रणात ठेवा – गोड पदार्थ कोणताही असला तरी त्याचं सेवन प्रमाणात असावं. कारण गोड पदार्थामुळं वृद्धत्वाची प्रक्रिया वेगानं सुरू होते. यामुळं मधुमेह देखील होतो. इतकंच नाही तर हृदयरोग, मुत्रपिंड किंवा मज्जातंतू नुकसान अशा इतर समस्या देखील उद्भवू शकतात. त्यामुळं शीतपेय, मीठाई, चॉकलेट आईस्क्रीम यांचं सेवन टाळावं.

4) व्हिटॅमिन ई असलेले पदार्थ खावेत – जसं वय वाढत जातं त्यासोबतच विसराळूपणा, एकाग्रता कमी होणं अशा समस्याही जाणवू लागतात. त्यामुळं आहारात पालेभाज्या, फळं यांचा समावेश करा. पालक, शतावरी, सीफूड किंवा सुर्यफुलाच्या बिया यांच्यात व्हिटॅमिन ईचं प्रमाण मुबलक असतं. त्यामुळं आहारात अशा पदार्थांचा समावेश करावा.

5) अँटी ऑक्सिडंट महत्त्वाचे – चाळशीत आपल्या आहारात अँटीऑक्सिडंट्सचा समावेश असावा. कारण आपली त्वचा यामुळं निरोगी राहते. जसं वय वाढतं तसं त्याच्या खुणा चेहऱ्यावर दिसू लागतात. चेहऱ्यावर सुरकुत्या येणं, काळे डाग, चट्टे येणं, या समस्या निर्माण होतात. त्यामुळं आहारात अँटी ऑक्सिडंट्स ओमेगा 3 फॅटी अॅसिड्स, यांचा समावेश असलेले पदार्थ खावेत.

6) प्रथिनं आणि कॅल्शियम आवश्यक – मजबूत हाडांसाठी प्रथिनेयुक्त पदार्थांचा आहारात समावेश असावा. मासे, अंडी, तसंच सोयाबीन, मसूर, शेंगदाणे यांचा आहारात समावेश करा. ओव्हरबोर्ड जाणंही चांगलं नाही. त्यामुळं आपण किती प्रथिनं घेतो यासंदर्भात आपल्या आहारतज्ज्ञांशी बोला. जर कॅल्शियमच अभाव असेल तर यामुळं हाडांचं नुकसान होतं. हाडं निरोगी राहण्यासाठी बियाणं, दही, बदाम, अंजीर, मसूर वगैरे या पदार्थांचा आहारात समावेश करा. व्हिटॅमिन डी समृद्ध असलेले पदार्थ खा. कारण असं केल्यानं स्नायूंच्या सामान्य कामात मदत होऊ शकते. मासे आणि अंडी खाणं देखील हाडांसाठी उपयुक्त ठरू शकतं.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.