रामोशी समाजाचा अनुसूचित जाती जमाती मध्ये समावेश करा, राज्यपालांची भेट घेवून केली मागणी

जेजुरी (संदीप झगडे) : अखिल भारतीय बेरड,बेडर रामोशी समाज कृतिसमितीच्या शिष्टमंडळाने मुंबई येथे राज्यपाल (Governor) भगतसिंह कोशारी यांची भेट घेवून रामोशी समाजाचा अनुसूचित जाती किंवा जमाती मध्ये सामावेश करावा तसेच महाराष्ट्राच्या विविध भागातील राहणारा बेरड, बेडर व रामोशी समाज हा एकच आहे हे सिद्ध करण्यासाठी काही नागरिकांची डीएनए चाचणी करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

अखिल भारतीय बेरड, बेडर रामोशी समाज कृतिसमितीच्या शिष्टमंडळाने मुंबई येथे राज्यपाल भगतसिंह कोशारी यांची दि २२ रोजी भेट घेवून समाजाची व्यथा मांडली. यावेळी कृती समितीचे अध्यक्ष मोहनराव मदने,आद्यक्रांतीकारक राजे उमाजी नाईक हुतात्मा स्मारक संघाचे अध्यक्ष आप्पासाहेब चव्हाण, पदाधिकारी किरण चव्हाण, सपाट माकर, सुनील जाधव, शरद माकर, विठ्ठल जाधव, पोपटराव खोमणे, रामचंद्र नाईक उपस्थित होते.

स्वातंत्र्यपूर्व काळात राजे उमाजी नाईक, दौलती नाईक, हरी मकाजी नाईक या क्रांतिकारकांनी ब्रिटीशांच्या विरोधात उठाव केल्याने नायका, रामोशी, बेरड, बेरड आदींना ब्रिटीशांनी गुन्हेगार ठरविले. स्वातंत्र्या नंतर १९५० नायका समाजाला अनुसूचित जमाती मध्ये समावेश केला. नायका समाजाच्या महाराष्ट्रात रामोशी, नाईक, बेडर, बेरड या पोटजाती मध्ये मोडतात मात्र त्यांचा समावेश अनुसूचित जमाती मध्ये केला गेला नाही.

रामोशी, बेरड जमातींचा कोणताही वांशिक, मानववंशीय, समाजशास्त्रीय अभ्यास न करता या समजाला वेगवेगळ्या प्रवर्गात समाविष्ठ करून भारतीय संविधान कलम ३४१\३४२ नुसार मिळालेल्या अधिकार व हक्क यापासून वंचित ठेवण्यात आले आहे. महाराष्ट्र शासन विमुक्त जाती प्रवर्ग क्रमांक १ बेरड व क्रमांक ११ रामोशी यांना वगळून अनुसूचित जमाती क्रमांक ३५ नायका जामातीची वांशिक दृष्ट्या तत्सम जमात असलेली रामोशी बेरड समाजाला अनुसूचित जमातीचे कलम ३४२ सी ओ नुसार किंवा अनुसूचित जाती क्रमांक १० बेडर याची पोट जात (रामोशी,बेरड ) वांशिक असल्याने अनुसूचित जाती कलम ३४१ सी ओ १९ नुसार महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती \जमाती यादी मध्ये दुरुस्ती करून समाविष्ठ करावे अशी मागणी राज्यपाल यांच्याकडे करण्यात आल्याचे पोपटराव खोमणे यांनी सांगितले.