तमिळ सुपरस्टार विजयला ‘इन्कम टॅक्स’ विभागाचा झटका, कोट्यावधी रुपये जप्त

मुंबई : वृत्तसंस्था – दाक्षिणात्य अभिनेता विजयच्या घरी प्राप्तिकर विभागाकडून छापेमारी करण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. विजयसह दिग्दर्शक अंबू चेझियान यांच्या घरावर आणि विविध कार्यालयावर छापे टाकण्यात आले. प्राप्तिकर विभागाने एकूण 38 ठिकाणी छापेमारी करून तब्बल 65 कोटींची रक्कम जप्त करण्यात आली असल्याचे एका वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे.

अभिनेता विजय याची बुधवारी प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी कसून चौकशी केली. ही चौकशी सिनेमाशी निगडीत आयकरशी होती. विजय त्याच्या आगामी मास्टर सिनेमाचं चित्रीकरण करण्यात व्यस्त होता. मीडिया रिपोर्टनुसार, आयकर विभागाचे अधिकारी कोणतीही पूर्व कल्पना न देता विजयच्या सेटवर गेले. यामुळे काही तासांसाठी सिनेमाचे चित्रीकरण थाबवण्यात आले होते. अभिनेता विजय याच्यासह एजीएस सिनेमा व दिग्दर्शक अंबू चेझिया हे देखील प्राप्तिकर विभागाच्या रडारवर होते.

एजीएस सिनेमा कंपनीने विजयची मुख्य भूमिका असलेला बिजिल या चित्रपटाची निर्मिती केली होती. 180 कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात आलेल्या या सिनेमाने 300 कोटींहून अधिकची कमाई केली होती. सोशल मीडियावरही या सिनेमाच्या मिळकतीची खूप चर्चा रंगली होती. या सिनेमात विजयसोबत नयनतारा, जॅकी श्रॉफ, योगी बाबू यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या.