24.64 लाख करदात्यांना मिळाला 88,652 कोटी रुपयांचा Income Tax Refund

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयकर विभागाने शुक्रवारी सांगितले की, त्यांनी चालू आर्थिक वर्षात २४ लाखाहून अधिक करदात्यांना ८८,६५२ कोटी रुपयांपेक्षा जास्त परतावा दिला आहे. यात २३.०५ लाख करदात्यांना २८,१८० कोटी रुपयांचा वैयक्तिक आयकर आणि १.५८ लाखाहून अधिक करदात्यांना ६०,४७२ कोटी रुपयांचा कॉर्पोरेट कर देण्यात आला आहे.

आयकर विभागाने ट्वीट केले की, ‘सीबीडीटीने १ एप्रिल २०२० पासून आतापर्यंत २४.६४ लाखांहून अधिक करदात्यांना ८८,६५२ कोटी रुपयांपेक्षा जास्त परतावा जारी केला आहे. एकूण २३,०५,७२६ प्रकरणांमध्ये २८,१८० कोटी रुपयांचे आयकर परतावा आणि १,५८,२८० प्रकरणात ६०,४७२ कोटी रुपयांचा कॉर्पोरेट परतावा जारी करण्यात आला आहे.

केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड (सीबीडीटी) वैयक्तिक आयकर आणि कॉर्पोरेट कर व्यवस्था हाताळते.

अर्थ मंत्री याबाबत बोलले होते
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आत्मनिर्भर भारत अभियान जाहीर केल्यापासून परताव्याच्या कामाला आणखी वेग आला आहे. त्यांनी म्हटले होते, ‘आम्ही परतावा देण्यास उशीर करत नाही. आम्ही त्याला थांबवत नाही. आम्ही यासाठी वेगाने परतावा देत आहोत, कारण यावेळी तुम्हाला पैशांची आवश्यकता आहे आणि तो तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. आम्ही आमच्या प्रोत्साहनपर गणनेमध्ये कर परताव्याच्या पैशाचा समावेश केलेला नाही.’

मे मध्ये इतक्या लोकांना मिळाला परतावा
सीबीडीटीने १६ मे रोजी संपलेल्या आठवड्यात ३७,५३१ आयकरदात्यांना २,०५०.६१ कोटी रुपयांचा परतावा दिला होता. त्याचप्रमाणे कॉर्पोरेट करदात्यांना ८६७.६२ कोटी रुपयांचा परतावा देण्यात आला होता. त्याच बरोबर २१ मे रोजी संपलेल्या आठवड्यात म्हणजेच १७ मे ते २१ मे या कालावधीत १,२२,७६४ आयकरदात्यांना २,६७२.९७ कोटी रुपये परतावा देण्यात आला. त्याचबरोबर ३३,७७४ कॉर्पोरेट करदात्यांना ६,७१४.३४ कोटी रुपयांचा परतावा देण्यात आला होता.