वकिलाने ग्राहकाकडून घेतले 217 कोटी, एवढी संपत्ती पाहून अधिकारीही चक्रावले

पोलीसनामा ऑनलाईन : चंदिगडमधील एका वकिलावर कर चुकवल्याप्रकरणी प्राप्तिकर विभागाकडून छापा टाकण्यात आला आहे. वकिलाने ग्राहकाकडून तब्बल २१७ कोटी रुपये रोख स्वीकारल्याची माहिती अधिकाऱ्याकडून सांगण्यात आली आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, हरियाणा आणि दिल्लीमधील ३८ ठिकाणी प्राप्तिकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली. या छाप्यामध्ये अधिकाऱ्यांकडून साडे पाच कोटींची रोख रक्कम जप्त करण्यात आली.

वकिलाची ओळख मात्र उघड करण्यात आलेली नाही. तसेच वकिलाचे १० बँक लॉकर्सदेखील जप्त करण्यात आले असल्याची माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाकडून देण्यात आली आहे. “वाद मिटवण्यासाठी वकील आपल्या ग्राहकांकडून भरीव रक्कम रोख स्वरुपात घेत असल्याचा संशय होता.तसेच गेल्या अनेक वर्षांपासून केलेली गुंतवणूक आणि बेहिशोबी रकमेची कागदपत्रं तपासादरम्यान सापडली आहेत,” अशी माहिती विभागाने दिली आहे. “वकिलाने एका ग्राहकाकडून ११७ कोटी रुपये रोख रक्कम घेतली होती, पण रेकॉर्डवर फक्त चेकच्या माध्यमातून मिळालेली २१ कोटी दाखवली,” असा आरोप केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाकडून करण्यात आला आहे.

तर आणखी एका प्रकरणात त्या वकिलाने एका कंपनीकडून १०० कोटी रुपये घेतले होते असा दावा करण्यात आला आहे. “तो वकील हा सर्व पैसा निवासी आणि व्यावसायिक मालमत्ता विकत घेण्यासाठी वापरत होता.तसेच तो शाळांच्या ट्रस्टमध्येही वापरत होता त्याचे पुरावे सुद्धा भेटले आहेत. पुराव्यांनुसार महागड्या परिसरात त्याने गेल्या दोन वर्षात जवळपास १०० कोटींहून अधिक पैसे संपत्ती विकत घेण्यासाठी खर्च केले आहेत” असे केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाकडून सांगण्यात आले आहे. याशिवाय वकील आणि त्याच्या सहकाऱ्यांकडून रोख रक्कम देऊन शाळा आणि संपत्ती विकत घेतल्या.यांची किंमत १०० कोटींहून अधिक आहे अशी माहिती मिळाली आहे. हवाला फंडमधूनही त्या वकिलाने काही पैसे मिळवले होते.