देशातील फक्त 9 जणांची वर्षाची कमाई 100 कोटीपेक्षा जास्त, इन्कम टॅक्सच्या आकडयावरून झाले धक्कादायक खुलासे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतातील अब्जाधीशांची संख्या सातत्याने वाढत आहे, मात्र आश्चर्याची बाब म्हणजे देशात एक वर्षाचे उत्पन्न 100 कोटींपेक्षा जास्त असणाऱ्या केवळ 9 च व्यक्ती आहेत. मात्र, आयकर विभागाने या लोकांची नावे जाहीर केली नाहीत.

आयकर विभागाने आर्थिक वर्ष 2018-19 पर्यंतचा अपडेटेड टाइम-सीरिज डेटा आणि इनकम-डिस्ट्रिब्यूशन डेटा जारी केला आहे, ज्यात कॉर्पोरेट्स, हिंदू अविभाजित कुटुंबांचे (HUF) आणि व्यक्तींचे उत्पन्न वितरणाची माहिती समाविष्ट आहे. आयकर विभागाने जाहीर केलेल्या सन 2018-19 या आर्थिक वर्षाच्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की देशात अशा फक्त 9 व्यक्ती आहेत ज्यांचे वार्षिक उत्पन्न 100 ते 500 कोटींच्या दरम्यान आहे.

करोडपतींच्या संख्येत वेगाने वाढ –
आयकर विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 2017-2018 या आर्थिक वर्षात करोडपतींची संख्या 20 टक्क्यांनी वाढली आहे. देशात 1 कोटींपेक्षा जास्त उत्पन्न मिळविणार्‍या लोकांची संख्या 97,689 आहे. त्याच वेळी आयकर विभागाच्या 2016-17 च्या अहवालात देशातील करोडपतींची संख्या 81,344 होती.
त्याच वेळी 89,793 लोक आहेत ज्यांचे वार्षिक उत्पन्न एक ते 5 कोटी दरम्यान आहे. 5,132 लोक आहेत ज्यांचे उत्पन्न 5 ते 10 कोटी दरम्यान आहे. 100-500 कोटी रुपयांच्या यादीमध्ये 9 जणांचा समावेश आहे. आयकर विभागाने या लोकांची नावे मात्र जाहीर केली नाहीत.

2018-19 या मूल्यांकन वर्षात करोडपती करदात्यांची संख्या 20 % वाढून 97,689 वर पोहोचली आहे. मूल्यांकन वर्ष 2017-18 मध्ये एक कोटी रुपयांपेक्षा जास्त करपात्र उत्पन्न असलेल्या करदात्यांची संख्या 81,344 होती. यामध्ये सर्व करदात्यांचा समावेश केला गेला तर वार्षिक करपात्र उत्पन्न 1 कोटींपेक्षा जास्त लोक असणाऱ्यांची संख्या 1.67 लाख आहे. हे 2017-18 या मूल्यांकन वर्षापेक्षा 19 टक्के जास्त आहे.

आकडेवारीनुसार 15 ऑगस्ट 2019 पर्यंत एकूण 5.87 कोटी आयकर विवरणपत्र भरले गेले. 5.52 कोटीहून अधिक व्यक्तिगत , 11.13 लाख हिंदू अविभाजित कुटुंबे, 12.69 लाख कंपन्या आणि 8.41 लाख कंपन्यांनी रिटर्न भरले आहेत. 10-15 लाख रुपये मिळवणाऱ्या करदात्यांची संख्या 22 लाखाहून अधिक आहे.