मुख्यमंत्र्यांच्या सचिवाच्या घरावर छापे ; ९ कोटी रुपये जप्त

इंदौर : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे स्वीय सचिव प्रविण कक्कड यांच्यासह दोन जवळच्या लोकांवर आयकर विभागाने छापे घातले असून आतापर्यंत ९ कोटी रुपये हस्तगत केल्याचे सांगितले जात आहे. तीन राज्यात ५० ठिकाणी हे छापे घालण्यात आले आहेत. हवाला रॅकेटमार्फत लोकसभा निवडणुकीत पैशांची देवाण घेवाण होत असल्याच्या संशयावरुन ही छापेमारी करण्यात आली आहे.

हा छापा रविवारी पहाटे तीन वाजल्यापासून सुरु झाला असून त्यात दिल्ली, मध्य प्रदेशातील भोपाळ आणि इंदौरसहीत ६ ठिकाणी एकाच वेळी ही कारवाई करण्यात आली आहे. कमलनाथ यांचे स्वीय सचिव प्रविण कक्कड यांच्या विजयनगर येथील घरावर छापा घातला. तसेच कमलनाथ यांच्या जवळचे समजले जाणारे राजेंद्र कुमार मिगलानी यांच्या घरी १५ हून अधिक अधिकारी गेले. या वेळी बाहेर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

दिल्लीच्या आयकर विभागाला माहिती मिळाली की लोकसभा निवडणुकीत कलेक्शनचा खेळ खेळला जात असून हवालामार्फत पैशांची देवाण घेवाण केली जात आहे. या माहितीवरुन ही शोध मोहीम हाती घेण्यात आली असून त्यात आतापर्यंत ९ कोटी रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षाच्या अखेरीस झालेल्या मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीसाठी कमलनाथ यांचे स्वीय सचिव प्रविण कक्कड यांनी विधानसभा निवडणुकीत काँग्रेससाठी कॅम्पेन चालविले होते. त्यासाठी मोठा निधीही उभारला होता.