‘गायछाप’च्या उत्पादकावरील प्राप्तीकराच्या छाप्यात 335 कोटींची बेहिशेबी मालमत्ता उघड

अहमदनगर : प्राप्तीकर विभागाने संगमनेरमधील प्रसिद्ध तंबाखु उत्पादक समुहाच्या राज्यभरातील मालमत्तांवर छापे घातले असून त्यात तब्बल ३३५ कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता उघड झाली आहे. संगमनेर येथील गायछाप उत्पादन संपूर्ण राज्यात लोकप्रिय आहे. प्राप्तीकर विभागाकडून १७ फेब्रुवारीपासून या उत्पादकाच्या ३४ ठिकाणावर छापे घालून सर्च करण्यात येत होता.

या छाप्यांमध्ये एकूण १ कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त करण्यात आली आहे. तसेच स्थावर मालमत्तेच्या विक्रीतून झालेल्या ९ कोटी रुपयांच्या नफ्याची नोंद नसल्याचे या व्यावसायिकांने मान्य केले असल्याचे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

या समूहाने काही हस्तलिखित नोंदी व एक्सेल शिट्सच्या माध्यमातून २४३ कोटी रुपयांच्या तंबाखुजन्य पदार्थांची विक्री रोखीने करुन कोणताही व्यवहार न दाखवता करण्यात आल्याचे उघड झाले आहे. त्याचबरोबर तंबाखुची विक्री करणार्‍या काही वितरकांवर करण्यात आलेल्या कारवाईतून आणखी ४० कोटी रुपयांचे बेनामी व्यवहार पुढे आले आहेत.