आमदार डागा यांच्या 22 ठिकाणांवर छापेमारी, सापडले 450 कोटींच्या काळा पैशाचे घबाड !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयकर विभागाने मध्य प्रदेशच्या बैतूल येथे मोठी कारवाई केली. विभागाने सोयाचे उत्पादन करणाऱ्या कंपनीच्या परिसरात शोध सुरु केला. तेव्हा या ठिकाणी 450 कोटी रुपयांपेक्षा जास्त बेहिशेबी पैशांच्या घबाडाविषयी माहिती मिळाली.

आयकर विभागाने 18 फेब्रुवारीला बैतूल, सतना, मुंबई, सोलापूर आणि कोलाकातासह 22 ठिकाणी छापेमारीची कारवाई केली. ही सर्व बेहिशेबी मालमत्ता काँग्रेसचे आमदार निलय दागा आणि त्यांच्या नातेवाईकांची असल्याची माहिती दिली जात आहे.

‘प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो’नुसार (PIB),या छापेमारीच्या कारवाईत 8 कोटी रुपये रोख आणि 44 लाख रुपयांपेक्षा जास्त आंततराष्ट्रीय चलन जप्त केले आहे. याशिवाय 9 बँक लॉकरही सील करण्यात आले आहे. या समूहाने कोलकाता येथील बनावट कंपन्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रीमियमवर शेअरमधून 259 कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जमवली होती. आता ही रक्कम जप्त केली आहे.

शेअर विक्रीतून 27 कोटी
दागा यांनी शेअर विक्रीतून तब्बल 27 कोटींची कमाई केली होती. मात्र, त्यांनी ही खरेदी-विक्री कोलकाता स्थित बनावट कंपन्यांच्या माध्यमातून केली होती. यामध्ये शेअरची खरेदी-विक्री योग्य पद्धतीने केली गेली नाही.

दागा तेल व्यापाऱ्यांपैकी एक
निलय दागा हे मोठ्या तेल व्यापाऱ्यांपैकी एक आहेत. त्यांच्या वक्तव्यामुळे ते अनेकदा चर्चेत आले आहे. गेल्या वर्षी जून महिन्यात ते वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. जेव्हा त्यांनी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना ‘डंपर सिंह चौहान’ म्हटले होते. निलय दागा यांचे वडील विनोद दागाही काँग्रेसचे आमदार राहिले आहेत.