आयकर विभागाच्या छाप्यांमुळं व्यापारी भयभीत, सलग दुसऱ्या दिवशी तपासणी सुरूच, कांदा लिलाव ठप्प, शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

लासलगाव – केंद्र सरकारच्या आयकर विभागाने लासलगाव बाजार समितीतील दहा तर पिंपळगाव बाजार समिती एका कांदा व्यापाऱ्यावर छापे मारल्याने कांदा व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.आज सलग दुसऱ्या दिवशी देखील आयकर विभागाची तपासणी सुरू आहे.कांदा व्यापाऱ्यांनी आज लासलगाव बाजार समितीत कांदा लिलावात सहभागी न होण्याच्या निर्णयामुळे कांद्याचे लिलाव ठप्प झाले आहेत. कांदा लिलावासाठी आणलेला कांदा परत नेण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर आली. कांद्याचे लिलाव त्वरित सुरू न झाल्यास शेतकरी संघर्ष संघटनेच्यावतीने रस्तारोको, रेलरोको सारखे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला असून याचे निवेदन देखील बाजार समितीला दिले आहे.

कांदा व्यापाऱ्यांनी आज लासलगाव बाजार समितीत कांदा लिलावात सहभागी न होण्याच्या निर्णयामुळे कांद्याचे लिलाव ठप्प झाले आहेत. कांदा लिलावासाठी आणलेला कांदा परत नेण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर आली. यंदाच्या पावसाळी हंगामात जास्त दिवस पावसाचा झालेला मुक्काम व दमट हवामानामुळे चाळीत साठवलेला कांदा मोठ्या प्रमाणात सडला तर अतिवृष्टीमुळे नवीन लाल कांद्याचे पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे चाळीत साठवलेल्या कांद्याची मागणी देशांतर्गत वाढल्याने लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या बाजार भावाने तीन हजार रुपयांचा टप्पा पार करताच केंद्र सरकारने १४ सप्टेंबर रोजी पूर्वसूचना न देता कांद्याची निर्यात बंदी केली गेली. बुधवारी लासलगाव बाजार समितीत चार हजार आठशे रुपये इतका उच्चांकी बाजार भाव मिळताच दुसऱ्या टप्प्यात १४ ऑक्टोंबर रोजी लासलगाव, पिंपळगाव येथील कांदा व्यापाऱ्यांवर आयकर विभागाने छापे मारले गेले.

यामुळे कांदा व्यापारी लिलावात सहभागी न झाल्याने याचा थेट परिणाम कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर झाला. कुठेतरी कांद्याच्या बाजार भावातून दिलासा मिळत असताना या झालेल्या कारवाईमुळे कांद्याचे बाजार भाव कोसळणार तर नाही ना अशी भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. आज लासलगाव बाजार समितीत आणलेला कांदा हा परत नेण्याची नामुष्की शेतकऱ्यांना वाहतुकीचाही खर्च भरावा लागणार आहे, असं नानासाहेब बच्छाव यांनी सांगितले. कांद्याचे लिलाव हे त्वरित सुरू झाले पाहिजे, अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसह शेतकरी संघर्ष संघटनेने केली आहे.

लासलगाव बाजार समिती कांदा व्यापाऱ्यांवर आयकर विभागाचे छापे मारल्याने कांदा लिलाव ठप्प झाले आहेत. लवकरच बाजार समिती प्रशासन व कांदा व्यापाऱ्यांमध्ये बैठक घेऊन हे लिलाव पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती लासलगाव बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांनी दिली. केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या निर्णयामुळे थेट परिणाम हा कांद्याचा बाजार भावावर होतो. कांदा उत्पादकांना याचा थेट फटका बसत असल्याने याबाबत केंद्र सरकारजवळ पाठपुरावा केला जाणार आहे.

कांद्याच्या बाजारभावात चढ-उतार झाला की लगेच केंद्र सरकारकडून तातडीने दखल घेतली जाते. मात्र, व्यापाऱ्यांवर केलेल्या कारवाईतून काय निष्पन्न झाले, असा सवाल या क्षेत्रातील तज्ज्ञांनी केला आहे. कांद्याच्या बाजारभावात दररोज वाढ होत असून पाच हजार रुपयांचा टप्पा प्रतिक्विंटल पर्यंत पोहचण्याच्या तयारीत असताना व्यापाऱ्यांवर छापे टाकले गेले.