देशातील सर्वात श्रीमंत मुकेश अंबानी कुटुंबियांना प्राप्तिकर खात्याची नोटीस !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – देशातील सर्वात श्रीमंत कुटुंब म्हणून ओळखणारे जाणारे अंबानी कुटुंबीय मागील काही वर्षांपासून बिजनेसमध्ये एकापाठोपाठ एक यशाची शिखरे गाठत आहे. रिलायन्स जिओ ने JioFiber ब्रॉडबँड सेवा लॉन्च केल्यानंतर अंबानी कुटुंबीय आता आणखी एका कारणामुळे चांगलेच चर्चेत आले आहे. प्राप्तिकर विभागाच्या मुंबई विभागाने प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या कुटुंबातील सदस्यांना ‘ब्लॅक मनी ऍक्ट २०१५’ नुसार नोटीस पाठवली आहे. त्यामुळे हे कुटुंबिय अडचणीत येण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ‘अज्ञात / जाहीर न केलेल्या परदेशी उत्पन्न आणि मालमत्ता’ या तरतुदीअंतर्गत मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी आणि त्यांच्या तीन मुलांच्या नावे ही नोटीस पाठवली आहे. प्राप्तिकर विभागाने २८ मार्च २०१९ रोजी ही नोटीस पाठवल्याचे वृत्त आहे.

असे आहे प्रकरण
तपासात देशातील खुल्या ऑफशोर कंपन्याचे एचएसबीसी जिनेव्हा बँकेतील १४ खात्यांशी संबंध असल्याचे समजले होते. रिलायन्स ग्रुपशी या कंपन्यांचे संबंध असल्याची माहिती समोर आली होती. या १४ खात्यांमध्ये ६०१ दशलक्ष डॉलर्सची रक्कम जमा होती. ४ फेब्रुवारी २०१९ रोजी प्राप्तिकर खात्याच्या चौकशी अहवालात या १४ कंपन्यांमधून आलेला पैसा ‘कॅपिटल इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट’ नावाने वळविण्यात आला होता. पैशांचे लाभार्थी म्हणून अंबानी कुटुंबातील सदस्यांची नावं समोर आली होती. त्यानंतर तपासाअंती ही नोटीस बजावण्यात आली आहे.

असा झाला तपास
२०१५ मध्ये ‘इंडियन एक्स्प्रेस’ आणि ‘इंटरनॅशनल कंसोर्टियम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट्स’ यांनी मिळून एक तपास सुरू केला. या तपासाला ‘स्विस लिक्स’ या नावाने ओळखले जाते. याआधीच प्राप्तिकर चुकवून, अवैध मार्गाने भारताबाहेर जिनिव्हा, स्वित्झर्लंड येथील एचएसबीसी बँकेत खाते असलेल्या अंदाजे ७०० भारतीय व्यक्ती आणि सस्थांची माहिती सरकारला मिळाल्यानंतर प्राप्तिकर विभागाने चौकशीला सुरूवात केली होती. तपासादरम्यान ‘एचएसबीसी’ बँकेतील खातेधारकांची संख्या वाढून ती ११९५ झाल्याची माहिती उघड झाली होती. यातील या १४ खात्यांमध्ये तब्बल ६०१ दशलक्ष डॉलर्सची रक्कम जमा होती ज्यांचा संबंध अंबानी कुटुंबाशी होता.

दरम्यान, अंबानी उद्योग समूहाने अशी कोणत्याही प्रकारची नोटीस आली नसल्याचा खुलासा केला आहे.