शेवटच्या क्षणी राष्ट्रवादीत ‘इनकमिंग’ ! उमेदवारी कोणाला ? उत्सुकता शिगेला अन् चर्चेला उधाण

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – राणाजगजितसिंह पाटील यांनी भाजप प्रवेशानंतर दुबळ्या पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने आता उभारी घेतली आहे. शेवटच्या क्षणी राष्ट्रवादीत विधानसभेची उमेदवारी मिळावी यासाठी मोठी इनकमिंग सुरू आहे. भाजपाचे डॉ. प्रतापसिंह पाटील, शिवसेनेचे संजय पाटील दूधगावकर आणि संजय निंबाळकर यांनी गुरुवारी राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष जीवन गोरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत सुरू असलेल्या या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादीचा उमेदवार कोण, याची चर्चा मात्र शिगेला पोहचली आहे.

शिवसेनेने आपला उमेदवार जाहीर केल्यानंतर नाराज झालेल्या शिवसैनिकांनी आपला रोष व्यक्त करण्यास सुरूवात केली आहे. लोकसभेच्या तोंडावर भाजपातून काँग्रेसमध्ये दाखल झालेले जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संजय पाटील दूधगावकर यांनी उध्दव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन हातात बांधले. लोकसभा निवडणुकीत खासदार ओम राजेनिंबाळकर यांच्या विजयासाठी प्रयत्न केले. तेंव्हा विधानसभेसाठी आपल्याला शब्द देण्यात आला होता म्हणून आपण शिवसेनेत प्रवेश घेतला, अशी भावना दूधगावकर यांनी व्यक्त केली आहे. शिवसेनेने उमेदवार जाहीर करताच त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांच्याबरोबर दिवंगत गोपीनाथ मुंढे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते असलेल्या संजय निंबाळकर यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ आपल्या हातात बांधले आहे.

धनेश्वरी शिक्षण संस्थेचे संचालक डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी लोकसभा निवडणूकीपूर्वी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश केला. मात्र त्यांनीही अवघ्या सहा महिन्यातच भाजपाला रामराम करीत राष्ट्रवादीला जवळ केले आहे. भाजप शिवसेनेतील बंडाळी सध्या तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पथ्यावर पडत आहे. राष्ट्रवादीचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर यातील कितीजण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये थांबणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

नगराध्यक्ष राजेनिंबाळकर राष्ट्रवादीकडे ?
शिवसेनेचे नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी पालिका निवडणुकीत ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून शिवसेनेचा भगवा झेंडा खांद्यावर घेतला होता. विधानसभेसाठी ते देखील इच्छूक होते. उमेदवारीच्या शर्यतीतून त्यांना हेतुतः बाजूला सारल्यामुळे ते देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात असून स्वगृही परतण्याची शक्यता त्यांच्या अनेक समर्थकांमधून व्यक्त केली जात आहे. समाजमाध्यमावर तशी जोरात चर्चा सुरू आहे.

Visit : Policenama.com