Happy News : आरटीई प्रवेशाच्या वयोमर्यादेमध्ये वाढ

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) वंचित व दुर्बल घटकांतील २५ मोफत प्रवेशासाठी वयाची कमाल मर्यादा ७ वर्षे २ महिने २९ दिवस करण्यात आली आहे. पालकांनी केलेल्या मागणीनंतर या वयोमर्यादेत वाढ करण्यात आली आहे. इयत्ता पहिलीसाठी आरटीईअंतर्गत शाळांकडून प्रवेश दिले जातात. या प्रवेशासाठी असणारी मुदतही वाढवण्यात आली आहे. पूर्वीची मुदत ही २२ मार्च होती आता ३० मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे.

राज्यभरातील अनुदानित, विनाअनुदानित इंग्रजी व मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली किंवा शिशू गटातील २५ टक्के प्रवेश मोफत देणे बंधनकारक आहे. या प्रवेशासाठी ५ मार्चपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झालेली आहे. या प्रवेश प्रक्रियेतील वयोमर्यादेत वाढ करण्यासाठी पालकांकडून मागणी केली जात होती. आता यात वाढ करण्यात आली आहे. या प्रवेश प्रक्रियेत सहभाग घेण्यासाठी आतापर्यंत बालकाचे वय मर्यादा किमान ६ वर्ष व कमाल वय ६ वर्ष ११ महिने २९ दिवस होते. आता पहिलीतील प्रवेशासाठी बालकाची कमाल वय ७ वर्ष २ महिने २९ दिवस करण्याचा निर्णय शिक्षण विभागाकडून घेण्यात आला आहे.

सर्वाधिक अर्जपुणे जिल्ह्यातून

राज्यभरातील ९ हजार १९४ शाळांमधील १ लाख १६ हजार ७७५ जागांसाठी आतापर्यंत २ लाख १३ हजार ८६२ अर्ज आले आहेत. यातील सर्वाधिक अर्ज हे पुणे जिल्ह्यातून आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, ४८ हजार ११५ अर्ज पुणे जिल्ह्यातून आलेले आहेत. दरम्यान या प्रवेशासाठी पुणे जिल्ह्यात १६ हजार ५९४ जागा उपलब्ध आहेत.

या प्रवेशासाठी नोंदणी करताना पालकांना १ किमी, ३ किमी व त्यापेक्षा अधिक अंतरातील फक्त १० शाळा निवडता येतील. परंतु, प्रत्यक्ष एकच शाळेला प्रवेश मिळणार आहे. पाल्याला मिळालेला प्रवेश हा कोणत्याही सबळ कारणाशिवाय नाकारता येणार नाही. मुख्य म्हणजे विशिष्ठ कालावधीतच पालकाने आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करायचा आहे. अन्यथा पुढच्या फेरीत त्या पाल्याचा विचार केला जाणार नाही ही महत्त्वाची बाब आहे.