मॅग्नेटिक चिप असलेली डेबिट कार्ड ब्लॉक : रोखीच्या व्यवहारांमध्ये वाढ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मॅग्नेटिक चीप असलेल्या एटीएम, डेबिट कार्डमधून होणारे फसवणुकीचे प्रकार थांबविण्यासाठी १ जानेवारीपासून जुनी एटीएम कार्ड बंद करण्याचा निर्णय भारतीय रिझर्व बँकेने घेतला आहे. नवीन वर्षाचे चार दिवस उलटूनही अनेक ग्राहकांना नवीन ईएमव्ही कार्ड उपलब्ध होऊ शकलेले नाही. त्यामुळे विविध बँकांमध्ये रोखीचे व्यवहार वाढले असून, ग्राहकांना रांगेत उभे राहून व्यवहार करावे लागत आहेत.
देशात नोटाबंदीचा निर्णय झाल्यानंतर डेबिट कार्डद्वारो कॅशलेस व्यवहार करणाऱ्या  ग्राहकांच्या संख्येत मोठी वाढ झाली होती. मोबाइल अ‍ॅपचा पर्याय उपलब्ध असला, तरी अनेक जण तांत्रिक ज्ञानाअभावी व सुरक्षिततेच्या कारणामुळे डेबिट कार्डाद्वारेच व्यवहार करण्याला प्राधान्य दिले. पण ३१ डिसेंबरला कार्ड ब्लॉक झाल्यामुळे अशा ग्राहकांचीही गैरसोय झाली असून, बाजार पेठेतील रोख व्यवहारांमध्येही वाढ झाली आहे.
या कारणाने रोखीच्या व्यवहारांमध्ये वाढ-
रिझर्व्ह बँकेच्या निर्देशांनुसार सर्व बँकांनी एटीएममधून डेबिट कार्डद्वारे दिवसभरात ४० हजारांऐवजी केवळ २० हजार रुपयेच काढण्याचे निर्बंध घालण्यात आले. ३१ डिसेंबरला सर्व मॅग्नेटिक स्ट्रीप असलेली डेबिट कार्डही ब्लॉक करण्यात आली, परंतु ज्या ग्राहकांची एटीएम वा डेबिट कार्ड ब्लॉक झाली आहेत, त्यांना ईएमव्ही चिपचे नवीन कार्ड मिळालेले नाही. अशांना आता बँकेत रांगा लावून आपले व्यवहार करावे लागत आहेत.

परिणामी, नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यातच बँकांमध्ये रोख व्यवहार करणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे, एटीएम तथा डेबिट कार्ड उपलब्ध होऊनही दिवसभरात केवळ २० हजार रुपयेच खात्यातून काढता येत असल्याने, मोठी रक्कम काढण्यासाठीही ग्राहकांना बँकांमध्येच यावे लागत आहे. त्यामुळे ग्राहकांची रांग वाढल्याचे बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकाऱ्याने सांगितले.

या कारणाने बंद केली मॅग्नेटिक स्ट्रिप असलेली कार्ड –
जुन्या ATM किंवा डेबिट कार्डच्या मागील बाजूला एक काळ्या रंगाची पट्टी आहे. त्या काळ्या पट्टीमध्ये मॅग्नेटिक स्ट्रिप असते. ज्यात तुमच्या खात्याची संपूर्ण माहिती उपलब्ध असते. त्यामुळे खेरदीच्या वेळी तुम्ही कार्ड स्वाईप करता पण अनेक वेळा तुमचं कार्ड रिजेक्ट केलं जातं. अशा वेळी तुमचं कार्ड सुरक्षित नसल्याने तुमच्या खात्याची माहिती दुसऱ्या व्यक्तीला कळू शकते.
रिझर्व्ह बँकेनुसार मॅग्नेटिक स्ट्रिप कार्ड आता जुनी टेक्नोलॉजी झाली आहे. असे कार्ड बनवणं आता बंद झालं आहे. मॅग्नेटिक स्ट्रिपचं जुनं कार्ड वापरण्यासाठी सुरक्षित नसल्यानं बँकेकडून ते बंद करण्यात आलं आहे. त्याऐवजी नवीन EVM चीपचे कार्ड बँका देत आहेत.