सोने चांदीच्या दरात वाढ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – एकीकडे उन्हामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत तर दुसरीकडे ऐन लग्न सराईत सोन्याच्या दराचा पारा देखील चढला आहे. देशभरात सोन्याची मागणी वाढल्यामुळे त्याचा परिणाम सोन्याच्या दरावर झाला असून त्यामुळे सोने महागले आहे. स्थानिक बाजारात देखील सोन्याची मागणी वाढल्यामुळे सोन्याच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळाली. सोमवारी दिल्लीमध्ये सोनं 30 रुपयांनी वाढलं. 10 ग्रॅम सोनं 33,000 रुपये झालं.

शनिवारी सोनं 50 रुपयांनी स्वस्त होतं 32,970 रुपये प्रति 10 ग्रॅम झालं होतं. दिल्ली सर्राफा बाजारात 99.9 टक्के आणि 99.5 टक्के शुद्ध सोनं 30 रुपयांनी महागलं असून अनुक्रमे 33,000 रुपये आणि 32,830 रुपए प्रति 10 ग्रॅम झालं आहे. चांदीही 250 रुपयांनी महागली असून 38,700 रुपए प्रति किलो झाली आहे.

अखिल भारतीय सर्राफा संघाच्या मते, सोन्याच्या दागिण्यांची मागणी वाढल्य़ामुळे सोन्याचा भाव वाढला. दुसरीकडे चांदी देखील महागली आहे. चांदीचा भाव 250 रुपयांनी वाढला असून चांदी 38,700 रुपये प्रति किलोग्रॅम झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात न्यूयॉर्कमध्ये देखील सोनं महागलं आहे. न्यूयॉर्कमध्ये सोनं 1,283.50 डॉलर प्रति औंस झालं आहे.

कशी कराल खऱ्या दागिन्यांची पारखं
आजकाल खऱ्या दागिन्यांच्या सोबतच इमिटेशन ज्वेलरी किंवा नकली दागिने देखील बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. सोन्या-चांदीच्या किंवा इतर मौल्यवान रत्नांनी बनलेल्या दागिन्यांची खरेदी आपण शक्यतो आपल्या ओळखीतील आणि खात्रीशीर जव्हेऱ्यांकडेच करीत असतो. तरी अनकेदा चोख दागिना देण्याच्या बहाण्याने नकली दागिने किंवा रत्ने दिल्याच्या घटना सर्रास घडताना आपण ऐकत असतो. एखादा दागिना घ्यायचा झाला, तर त्यासाठी आपल्या मेहनतीचे पैसे आपण मोजत असतो, त्यामुळे इतके पैसे खर्च करून विकत घेतलेला जिन्नस चोख असावा ही आपली अपेक्षा योग्यच असते. आपण घेत असलेला दागिना चोख आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी काही पर्याय अवलंबता येतील.

दागिना खरेदी करताना सर्वात आधी त्यावर ‘हॉलमार्क’ किंवा आपण ज्यांच्याकडून दागिना खरेदी करीत आहोत त्यांचा ट्रेडमार्क त्यावर असल्याची खात्री करून घ्यावी. तसेच दागिना ज्या धातूने बनलेला आहे, त्याची शुद्धता देखील या ट्रेडमार्कमध्ये अंकित असते. दागिन्यामध्ये चोख धातूची मात्रा जास्त असल्यास हा दागिना लोहचुंबकाला पटकन चिकटणार नाही. पण धातूमध्ये इतर कमी दर्जाच्या धातूची भेसळ असल्यास तो धातू लोहचुंबकाला पटकन चिकटतो. सोन्याची पारख करताना दागिना ‘अनग्लेझ्ड’ टाईलवर घासून पाहिल्यास टाईलवर सोनेरी डाग येतील. जर सोने शुद्ध नसेल, तर टाईल वर उठणारे ओरखडे राखाडी किंवा काळसर रंगाचे दिसतात. सोने चोख आहे किंवा नाही हे पाहण्याचा आणखी एक पर्याय म्हणजे व्हिनेगर. व्हिनेगर दागिन्यावर टाकले असता, दागिन्यातील सोने चोख नसेल, तर दागिना लगेच काळा पडल्याचे दिसून येते.

हातात घातलेली चांदीची अंगठी जर शुद्ध चांदीची असेल, तर जिथे त्या दागिन्याला सतत पाणी, तेल किंवा इतर तत्सम पदार्थ लागत असेल, तेथील त्वचा निळसर दिसू लागते. तसेच चांदीच्या जिन्नसावर खडू घासला असता, जर चांदी शुद्ध नसेल, तर ज्या ठिकाणी खडू घासला आहे तो भाग त्वरित काळा पडू लागतो. त्यावरून दागिन्यातील चांदी शुद्ध असल्याचे समजू शकते. प्लॅटीनम चांदी प्रमाणेच शुभ्र दिसते. याचा दागिना चोख आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी अमोनियाचा वापर करता येतो. अमोनियाचे काही थेंब दागिन्यावर टाकले असता, धातू चोख नसल्यास तो त्वरित काळा पडतो.