‘कोरोना’मुळे नागपूर, कोल्हापुरात मृत्युदरात वाढ !

पोलिसनामा ऑनलाईन – राज्यातील करोनाबाधितांच्या तुलनेत मृतांमध्ये महिनाभरात काही अंशी घट झाली आहे. मात्र, नागपूर, चंद्रपूरमधील मृत्यूदरांमध्ये एका टक्क्याने वाढ नोंदविण्यात आली आहे. कोल्हापूर, सांगली आणि रायगड जिल्ह्यातही मृत्युदरात वाढ झाली आहे. जुलै-ऑगस्टमध्ये नव्याने आढळलेले रुग्ण आणि मृत्यूच्या नोंदीनुसार जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये राज्याच्या मृत्युदरात 0.31 ने घट झाली आहे. त्याचवेळी नागपूरच्या मृत्युदरात मात्र जवळपास एका टक्क्याने वाढ झाली आहे.

नागपूरमधील रुग्णसंख्याही महिनाभरात 4,494 वरून थेट 28,042 वर पोहचली आहे. मृत्यूचा आलेखही 70 वरून 730 पर्यंत गेला आहे. जुलैमध्ये शून्य मृत्यूची नोंद असलेल्या चंद्रपूरचा मृत्यूदर ऑगस्टमध्ये एक टक्क्यापर्यंत आला. चंद्रपूरमध्ये आतापर्यंत 19 रुग्णांचा मृत्यू झाला असून, रुग्णांचे प्रमाण 412 वरून 2,370 पर्यंत वाढले आहे. कोल्हापूरमध्येही मृत्युदराचे प्रमाण 0.82 टक्के वाढले आहे. महिनाभरात येथील मृतांची संख्या 95 वरून 646 तर रुग्णांच्या संख्येत पाचपटीहून अधिक वाढ झाली आहे. सांगलीतही मृत्यूच्या प्रमाणात वाढ झाली असून, मृतांची संख्या 58 वरून 427 वर गेली आहे. सांगलीची रुग्णसंख्याही एका महिन्यात दोन हजारावरून 13 हजारांपर्यत वाढली आहे. ऑगस्टमध्ये मुंबईच्या मृत्युदरात घट नोंदवण्यात आली. मात्र, एमएमआर परिसरात रायगडचा मृत्यूदर 0.76 टक्कयांनी वाढला आहे. रायगडची रुग्णसंख्या सुमारे 14 हजारांनी वाढली असून, मृतांच्या संख्येत दुपटीहून अधिक वाढ झाली आहे. त्याखालोखाल पालघरमधील मृतांचे प्रमाण वाढले असून, येथील मृतांची संख्या 322 वरून 591 वर पोहचली आहे.