पुणेकरांना थंडीसाठी करावी लागणार 20 दिवसांची प्रतीक्षा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – दिवाळीपूर्वीच आगमन झालेल्या गुलाबी थंडीचे प्रमाण कमी होताना दिसत आहे. गेल्या दोन दिवसांपासून अंशत- ढगाळ वातावरण असल्याने थंडीचे प्रमाण कमी होत असून काही भागात पावसानेही हजेरी लावली आहे. किमान तापमानात सरासरीपेक्षा एक ते चार अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली असून डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून काही प्रमाणात थंडी पडण्यास पुन्हा सुरुवात होण्याची शक्‍यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

सामान्यता ऑक्टोबर ते जानेवारी असा हिवाळ्याचा कालावधी असतो. हिवाळ्याची सुरवात ही दिवाळीनंतर होते. मात्र, यंदा हे चित्र काही प्रमाणात बदलले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा नोव्हेंबरच्या गेल्या तीन दिवसांमध्ये कमाल व किमान तापमान अधिक असल्याने शहरात उकाडा जाणवू लागला आहे. राज्यातही अशीच स्थिती असून, पुढील वीस दिवसानंतर मात्र राज्यात थंडीचा जोर वाढण्याची चिन्हे असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे.

देशात ईशान्य मॉन्सून सक्रिय आहे. परिणामी ईशान्य आणि उत्तरेकडून राज्यात वाहणारे वारे हे आपल्यासोबत आर्द्रताही आणत आहे. त्यामुळे राज्यातील काही भागांमध्ये ढगाळ वातावरण निर्माण झाले असून, किमान तापमानाचा पारा वाढत आहे व थंडी कमी होत आहे. तसेच शहरात अंशत- ढगाळ वातावरणाची स्थिती असून काही भागात पाऊस पडत आहे.

डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात थंडी
शहरात येत्या २७ ते २८ नोव्हेंबर दरम्यान किमान तापमानात सरासरीपेक्षा किंचित घट दिसून येईल. मात्र, त्यानंतर किमान तापमानात वाढ होणार असून डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यानंतर किमान तापमानाचा पारा घसरण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये थंडीचा कडाका वाढेल, असे हवामानशास्त्रज्ञ डॉ. अनुपम काश्‍यपी यांनी सांगितले.

नोव्हेंबरमधील परिस्थिती
राज्यात २० ते २६ नोव्हेंबर दरम्यान काही ठिकाणी ढगाळ वातावरण असेल. दक्षिण महाराष्ट्र, विदर्भ व कोकण गोव्यात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत १ ते २ अंश सेल्सिअसने घट.

२७ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर राज्यात कोरडे हवामान असून, कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत २ ते ५ अंश सेल्सिअसने घट. तर, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भातील काही भागांमध्ये किमान तापमानाचा पारा सरासरीपेक्षा २ ते ४ अंश सेल्सिअसने घसरू शकेल.

गेल्या तीन दिवसांमधील किमान व कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
दिनांक १७ नोव्हेंबर २०२०, १८ नोव्हेंबर २०२०, १९ नोव्हेंबर २०२०

किमान तापमान – १८.६, १८.५, २०.३
कमाल तापमान – ३१.५, ३२.६, ३३.३