’माझी वसुंधरा’ अभियान लोकसहभागाने राबवावे : आदित्य ठाकरे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सरकारचे विविध विभाग, स्वयंसेवी संस्था, पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते यांच्यासह लोकसहभागातून ’माझी वसुंधरा’ योजना प्रभावीपणे राबवावी, असे आवाहन मंत्री आदित्य ठाकरे यांनी यावेळी केले.

पर्यावरण रक्षणाच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यात नुकत्याच सुरू केलेल्या ‘माझी वसुंधरा’ अभियानाच्या पुणे आणि कोकण विभागातील नियोजनाची माहिती पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दूरचित्र संवादाद्वारे नुकतीच घेतली. त्यांनी दोन्ही विभागांचे आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा केली आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले की, अनियमित पाऊस, निसर्गसारखी वादळे किंवा कोरोना विषाणूसारखी संकटे ही सर्व हवामानातील बदलामुळे निर्माण झालेली आहेत. यावर लवकर नियंत्रण मिळवण्यासाठी पर्यावरण रक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे येत्या काळात ‘माझी वसुंधरा’ अभियानातील सर्व घटकांची प्रभावी अंमलबजावणी करावी. याची सुरुवात सरकारी कार्यालयांमधून करावी.

सरकारी कार्यालयांतील ऊर्जा, पाणी वापराचे लेखापरीक्षण, कचर्‍याचे व्यवस्थापन, साधनसामग्रीचे व्यवस्थापन, परिवहन साधनांचे लेखापरीक्षण, अडगळीतील सामानाचे व्यवस्थापन, कार्यालय परिसरातील वृक्षाच्छादन आदींवर काम करावे. तसेच सर्वांनी आपल्या प्राधान्यक्रमामध्ये या योजनेचा समावेश करावा, असे आवाहनही आदित्य ठाकरे यांनी यावेळी केले.

यावेळी पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अशोक शिनगारे हे मंत्रालयातून सहभागी झाले होते, तर पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव, कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्यासह दोन्ही विभागांतील जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदी वरिष्ठ अधिकारी ऑनलाईनद्वारे सहभागी झाले होते.

भावी पिढीला स्वच्छ जमीन, स्वच्छ हवा, शुद्ध पाणी व मुबलक ऊर्जा देणे हे आपले कर्तव्य आहे. यासाठी पर्यावरणाच्या विविध घटकांचे संरक्षण व संवर्धन करणे गरजेचे आहे. सर्वांनी समन्वयाने ‘माझी वसुंधरा’ अभियान प्रभावीपणे राबवून महाराष्ट्रास पर्यावरण रक्षणाच्या चळवळीमध्ये अग्रभागी ठेवावे, असे पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी म्हटले आहे.