बदलत्या जीवनशैलीमुळे रक्ताच्या विकारांमध्ये वाढ

पोलीसनामा ऑनलाइन टीम – पायाच्या नसांमध्ये गुठळी झाल्यास ती फुप्फुसांमध्ये जाऊन अडकते आणि श्वासोच्छवास बंद झाला की पेशंटचा मृत्यू होतो. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीत गाठ आढळल्यास रक्तपुरवठा खंडित होतो. रक्ताच्या या विकारांचा गुंता सुरुवातीला सुटत नसल्यानं अनेकांचं प्राण जातात. अशाप्रकारे बदलत्या जीवनशैलीमुळे रक्ताच्या विकारांमध्ये वाढ झाली आहे. प्रामुख्यानं ५० ते ७० वयातील व्यक्तींमध्ये हा आजार आढळतो. ‘ब्रेन ॲटॅक’, ‘लेग ॲटॅक’ हे प्रकार वाढत चालले आहेत.

रक्तवाहिन्यांमध्ये पुरेसे घटक नसले, तर ‘डीव्हीटी’ नावाचा आजार होतो. प्रोटीन किंवा म्युटेशन नसल्यानं रक्त गोठतं. जास्त पाणी न पिणं, डिहायड्रेशनमुळे रक्त गोठणं, एकाच स्थितीमध्ये पाय न हलविल्यास त्या व्यक्तीमध्ये पायाच्या नसांमध्ये रक्ताची गुठळी होण्याची शक्यता असते. जास्त वेळ उभं राहणं किंवा सातत्यानं बसून काम करण्याच्या स्थितीमुळे रक्तवाहिन्या फुगतात. त्या पेशंटला ‘डीव्हीटी’ हा आजार बळावतो. काही रक्तवाहिन्यांमध्ये पारदर्शक घटक (वेब) असतात. त्यामुळे रक्तप्रवाह कमी होतो. त्यामुळेही ‘डीव्हीटी’चा आजार होतो. रक्ताच्या आजारांचं निदान करणं अनेकदा अशक्य होतं. काही वर्षांपूर्वी ‘डीव्हीटी’चा आजार झाल्यास रक्त पातळ करण्याची औषधं आयुष्यभर सुरू ठेवावी लागत होती. त्या उपचाराच्या पद्धतीत कालांतरानं बदल झाला आहे. ‘कॅथेटर डायरेक्टेड थ्रोम्बोलायसिस’ हे उपचार दिले जातात. जिथं गुठळी झाली आहे, त्या ठिकाणी रक्तवाहिनीला छिद्र केलं जातं. तिथून ट्यूब टाकून त्या माध्यमातून गाठ बाहेर काढली जाते. त्या उपचार पद्धतीला ‘कॅथेटर डायरेक्टेड थ्रोम्बोलायसिस’ म्हणतात.

या उपचाराच्याही पुढील उपचार आहेत. त्या उपचार पद्धतीला ‘अँजिओजेट’ म्हणतात. या अद्ययावत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एका बाजूनं रक्त बाहेर काढलं जातं आणि दुसऱ्या बाजूनं रक्त आत घेण्यात येतं. त्यामुळे गुठळ्या बाहेर पडणं शक्य होतं. पूर्वी कॅथेटरनं गुठळ्या बाहेर काढण्यासाठी तीन ते चार तासांचा कालावधी लागत होता. आता १५ ते २० मिनिटांमध्ये गुठळ्या बाहेर निघतात. रक्तवाहिन्या फुगण्यामुळे अथवा रक्ताच्या गुठळीमुळे आजार बळावतात. पाय दुखणं, पोट दुखणं, पोटातील नसांमध्ये दुखणं, पाय लाल होणं, गरम होणं, सूज येणं अशी लक्षणं दिसतात. पायात रक्ताची गुठळी झाल्यास ती फुप्फुसांमध्ये जाते आणि त्याला ‘पल्मोनरी एम्बोलिझम’ म्हणतात.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/