चुकीच्या जीवनशैलीमुळे मधुमेही रूग्णांच्या रक्तातील साखरेच्या पातळीत वाढ : तज्ज्ञ डॉक्टर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोविड-१९ या आजाराने जगभरात एकच हाहाकार उडवला आहे. पुणे शहरात दिवसेंदिवस रूग्णसंख्या वाढताना दिसून येत आहे. त्यात मधुमेही रूग्णांना कोरोनाचा धोका सर्वांधिक आहे. असे असूनही खाण्याच्या चुकीच्या पद्धती, ताणतणाव आणि व्यायामाचा अभाव यामुळे मधुमेही रूग्णांच्या रक्तातील साखरेच्या पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे मधुमेही रूग्णांनी नियमित वैद्यकीय तपासणी करून घ्यावी, असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टर देत आहेत.

कोरोना रूग्णांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी देशभरात लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. संसर्गापासून बचाव व्हावा, यासाठी घराबाहेर न पडण्याचे आवाहन सरकारद्वारे नागरिकांना केले जात आहे. यामुळे अनेक लोक नियमित चाचणी करण्यासाठी रूग्णालयात जाण्याऐवजी घरीच राहत आहेत. वेळीच निदान न झाल्यास आजार बळावू शकतो.

याबाबत बोलताना अपोलो डायग्नोस्टिक्स वेस्ट इंडियाचे तंत्ज्ञ प्रमुख आणि झोनल पॅथॉलॉजिस्ट डॉ. संजय इंगळे म्हणाले की, नागरिकांना घरी राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. परंतु, रक्तातील साखरेचं प्रमाण वारंवार तपासून पाहणेही अतिशय गरजेचं आहे. कारण, रक्तातील साखरेची पातळी वाढल्यास रक्तप्रवाह अन्य निरोगी व्यक्तीपेक्षा खूपच कमी प्रमाणात होतो. यामुळे रोगप्रतिकारकशक्ती कमी होऊन मधुमेही रूग्णांना अन्य आजारांचा संसर्ग पटकन होऊ शकतो. आणि त्यातून रूग्णाला बरं व्हायला वेळ लागतो.

डॉ. इंगळे पुढे म्हणाले की, रक्तातील साखरेचं प्रमाण वाढल्यास अनेक गंभीर आजार बळावू शकतात. जसे, हृदयविकार, मूत्रपिंडाची समस्या आणि डोळ्यांची दृष्टी कमी होणे इत्यादी. याशिवाय रक्तातील साखरेची पातळी वाढली तर नसांना आणि रक्तवाहिन्यांना इजा होऊ शकते, याचा विपरित परिणाम मेंदूच्या पेशींवर होतो. यामुळे अंधत्व, मूत्राशयातील समस्या आणि लैंगिक समस्या यांसारख्या इतर समस्यांना देखील कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवणे गरजेचं आहे. तसेच मधुमेही असलेल्या लोकांमध्ये हायपोग्लेसिमीया सुद्धा असू शकतो. (रक्तातील साखर (ग्लूकोज) पातळी सामान्यापेक्षा कमी असणे) हे धोकादायक ठरू शकते. जर तुमच्या शरीरात साखरेचं प्रमाण ७० मिलीग्राम/डीएलपेक्षा कमी आहे.

तणावामुळे, जास्त खाल्ल्याने आणि पुरेसे इन्सुलिन न घेतल्याने साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहत नाही. त्यामुळे अनेकदा थकवा जाणवणे, तहान आणि मधुमेहाच्या केटोसिडोसिसची लक्षणं दिसू लागतात. त्यामुळे वेळोवेळी आपल्या रक्तातील साखरेची मात्रा तपासून पाहण्यासाठी ग्लूकोमीटर किंवा सतत ग्लूकोज मॉनिटर वापरावेत. हे अतिशय फायदेशीर ठरू शकतं, असेही डॉ. इंगळे म्हणाले.

पुण्यातील अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटलचे जनरल फिजिशियन डॉ. संजय नगरकर म्हणाले की, ‘‘लॉकडाऊन दरम्यान लोकांनी मधुमेहावर नियंत्रण न ठेवल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढलेल्या रूग्णांमध्ये ७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. अनेक लोक नियमित चाचणी, निरोगी जीवनशैली अक्षम होते. त्यामुळे त्याच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. उदाहरणार्थ – मधुमेह असलेल्या वृद्धांना कोरोनाव्हायरसची लागण होण्याचा धोका वाढू शकतो. याशिवाय चिंतेमुळेही मधुमेही रूग्णांच्या रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.’’

‘‘होम ग्लूकोज मॉनिटरिंगच्या सहाय्याने घरच्या घरी रक्तातील साखरेची पातळी तपासता येऊ शकते. यासाठी साखरेचं प्रमाण १४० आणि १८० मिलीग्राम/डीएलपेक्षा कमी असले पाहिजे. याशिवाय रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी भरपूर पाणी प्या, फळे आणि हिरव्या पालेभाज्यांचे सेवन करा. नियमित व्यायाम करा, यामुळे ताणतणाव कमी होतो. यासाठी योगा, प्राणायाम, आणि श्वासोच्छवासाचा सराव करा. कोणतीही समस्या असल्यास फोनद्वारे संपर्क साधून डॉक्टरांचा सल्ला घ्या. आपल्या रक्तातील साखरेच्या पातळीनुसार इन्सुलिन डोस सेट करा. डॉक्टरांनी सांगितलेल्या वेळेत आपले इन्सुलिन घ्या. नियमित तपासणी करून निरोगी आयुष्य जगा’’, असेही डॉ. नगरकर म्हणाले.