काय सांगता ! होय, ‘वर्क फ्रॉम होम’मुळं शारीरिक समस्यांमध्ये ‘कमाली’ची वाढ

दिल्ली :  पोलीसनामा ऑनलाइन –   कोरोना संसर्ग टाळण्यासाठी देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्या नंतर अनेकांना वर्क फ्रॉम होम देण्यात आले. तज्ज्ञांच्या मतानुसार सध्या वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांमध्ये पाठदुखी , निद्रानाश आणि तणाव , चिंता , अस्वस्थता हे दुष्परिणाम दिसून येत आहेत . २३ मार्च रोजी देशात २१ दिवसांसाठी लॉकडाउन जाहीर करण्यात आले. त्यानंतर ते वाढवून ३ मे पर्यंत करण्यात आले. वर्क फ्रॉम होम करणाऱ्या अनेक जणांनी आपली मते नोंदवली आहेत. जाणून घेऊयात नेमके काय परिणाम होत आहेत.

दिल्लीतील तंत्रज्ञ सुरेश शर्मा सांगतात, ‘मी बहुतांशी वेळ एकतर लॅपटॉपच्या समोर किंवा मोबाइल स्क्रीनसमोर घालवत आहे. सुरुवातीला वर्क फ्रॉम होम मी एन्जॉय केले. मात्र, यामुळे आपल्या शरीरावर दुष्परिणाम होत आहेत, हे नंतर नंतर लक्षात येऊ लागले. ऑफिसमध्ये असताना आम्ही मीटिंग घ्यायचो, लोकांशी संवाद साधायचो, आता मात्र सगळेच ऑनलाइन झाले आहे.’ पाठदुखी वाढली आहे आणि डोकेदुखीही वारंवार होऊ लागली आहे, असेही त्यांनी सांगितले. तसेच बेंगळुरू येथील गीता मल्होत्रा म्हणाल्या ‘वैयक्तिक जीवन आणि व्यावसायिक जीवन यातील रेषा पुसटशी होत चालली आहे. निद्रानाशाचा त्रास सुरू झाला आहे. रात्री चार तासांपेक्षा कमी झोपत आहे. हवे तेव्हा मी खाऊ लागले आहे. कधी दिवसातून दोनदा, तर कधी चार वेळा खात आहे. मी थोडीफार चालायचे, तेसुद्धा आता बंद झाले आहे. लॉकडाउन सुरू झाल्यापासून माझे वजन चार किलोने वाढले आहे. डोकेदुखीही वाढली आहे. ‘मोठ्या आयटी कंपन्यांचे ९० ते ९५ टक्के कर्मचारी घरून काम करीत आहेत. शरीर आणि मन निरोगी राखण्यासाठी घरी दररोज ध्यानधारणा आणि व्यायाम करा, असे तज्ज्ञ सांगत आहेत.

सायकॉलॉजिस्ट प्रीती सिंग म्हणतात, ‘लोकांना शारीरिक श्रम करण्याची संधी मिळत नसल्याने या समस्या उद्‌‌भवत आहेत. निराशेमधूनही या समस्या निर्माण होतात.”काही जणांना ऑफिसचे काम आणि घरातील जबाबदाऱ्याही सांभाळाव्या लागत असल्याने, थकवा जाणवत असावा; तर काही जणांना नोकरी टिकण्याचे टेन्शन असल्याने तणाव वाढत आहे, असेही सिंग म्हणाल्या. बेंगळुरू येथील आर्किटेक्ट असलेल्या शैलजा एस. म्हणाल्या, ‘मला अधूनमधून तणावामुळे अॅटॅक येत आहेत. मी सतत अस्वस्थ आहे. ऑफिसमधून मेसेज आला की काय, असे वाटून मी सतत फोन चेक करत आहे.’गुरुगाव येथील मल्टी-नॅशनल कंपनीतील सल्लागार राहुल कुमार म्हणतात, ‘माझ्या शरीराची ठेवण बिघडत चालली आहे. पाठदुखी वाढली आहे. अस्वस्थता आणि निराशा वाढली आहे. माझे डाएट आणि व्यायामाचे दैनंदिन वे‌ळापत्रक बिघडले आहे.

एकंदरीतच वर्क फ्रॉम होम हि अनेकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.