NCB चे अधिकारी समीर वानखेडे यांच्या पथकाची सुरक्षा वाढवली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश करणारे NCB चे डॅशिंग झोनल अधिकारी समीर वानखेडे यांच्या पथकाच्या सुरक्षेत वाढ केली आहे. वानखेडे यांनी नुकतीच दाऊदच्या हस्तकांच्या डोंगरीतील ड्रग्स फॅक्टरीत घुसून कारवाई केली होती. दाऊदच्या हस्तकाच्या आणि गँगस्टर करीम लालाचा नातेवाईक चिंकू पठाणच्या मुसक्याही आवळल्या होत्या. त्यामुळे सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर पथकाची शस्त्र वाढवली आहेत.

याबाबत NCB चे अधिकारी समीर वानखेडे म्हणाले की, माझी सुरक्षा वाढवली नसून मला यापूर्वीही कोणतीही सुरक्षा नव्हती. गोरेगाव परिसरात नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) पथकावर ड्रग्ज तस्करांच्या टोळीने प्राणघातक हल्ला केला होता. त्यानंतर माझ्या पथकातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडील शस्त्र वाढवण्यात आली आहेत. त्यामुळे सुरक्षा म्हणून ही शस्त्रांची वाढ करण्यात आली आहे.

डोंगरी येथे जी ड्रग्ज फॅक्टरी उध्दवस्त करण्यात आली,त्या लोकांचे अंडरवर्डशी संबंध असल्याचे बोलले जात आहे. करीम लालाच्या नातवाला वानखेडे यांनी अटक केली होती. आरीफच्या घरात घुसून समीर वानखेडे यांनी धाड टाकली होती. त्यामुळे वानखेडे यांच्या पथकाच्या सुरक्षेत वाढ केली आहे.