राज्यातील प्रमुख नेत्यांच्या सुरक्षेत वाढ

सोलापूर : पोलिसनामा ऑनलाईन – पुलवामा हल्ल्यानंतर देशभरात अलर्ट जारी करण्यात आला आहे. रायगडमध्ये देखील बॉम्ब सापडल्याने आता  राज्यातील प्रमुख नेत्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. रायगडमध्ये बॉम्ब सापडल्याच्या घटनेनंतर पोलीस सतर्क झाले आहेत. आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत. त्या पार्श्वभूमीवर शरद पवारांना तगडा पोलिसबंदोबस्त देण्यात आला आहे.

शरद पवार यांची सोलापूर शहरात ज्या ठिकाणी बैठक होती, त्या ठिकाणी शहर पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला होता. तसेच श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले होते. शरद पवार बुधुवारी नांदेड येथील सभा आटोपून विमानाने सोलापूरमध्ये आले. त्यानंतर शहरातील रामलाल चौक येथे असलेल्या राष्ट्रवादी भवनमध्ये त्यांनी बैठक घेतली. बैठकीच्या आधी श्वानपथक तसेच बॉम्बशोधक पथकाने ताबा घेऊन संपूर्ण कार्यालयाची तपासणी केली होती.