पुजाराच्या शतकाने तारले 

अॅडलेड : वृत्तसंस्था – ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात आज भारताची  खराब कामगिरीने सुरुवात झाली. या सामन्यात भारताने पहिल्या दिवसअखेर चेतेश्वर पुजाराच्या शतकाच्या बळावर ९ बाद २५० धावांपर्यंत मजल मारली. शतकी कामगिरी बरोबरच त्याने आज  कसोटी कारकिर्दीतल्या ५००० धावा पूर्ण केल्या.

या कसोटीत भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय फलंदाजांनी विराटचा निर्णय अक्षरशः चुकिचा ठरवला. ऑस्ट्रेलियन गोलंदाजीपुढे टीम इंडियाची सुरुवातीला  चार बाद ४१ अशी अवस्था झाली  होती. पण पुजाराने रोहित शर्मा, रिषभ पंत आणि रविचंद्रन अश्विनच्या साथीने भारताच्या डावाला आकार दिला. रोहितने ३७  तर पंत आणि अश्विनने प्रत्येकी २५  धावा केल्या.

भारताच्या भरवशाच्या फलंदाजांनी ऐन वेळी विकेट गमावल्याने भारताची दिवसभर पडझड होतच राहिली. परंतु पुजाराने मात्र दुसरी बाजू चांगली सांभाळली. त्याने २४६ चेंडुत ७ चौकार आणि २ षटकारांसह १२३ धावांची  खेळी केली. पॅट क्युमिन्सने धावचित करत त्याची खेळी संपुष्टात आणली. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी उत्तम गोलंदाजीचे प्रदर्शन घडवले.

पुजाराचा पराक्रम –
पुजाराने २३९ चेंडूत ६ चौकारांच्या आणि १ षटकाराच्या साहाय्याने शतक पूर्ण केले. पुजाराच्या या अप्रतिम खेळीमुळे पुजाराने आपल्या कसोटी कारकिर्दीतील ५ हजार धावांचा टप्पा गाठला.  त्याच्या आता ५०२८ कसोटी धावा आहेत. ५ हजार कसोटी धावा करणारा पुजारा १२ वा भारतीय खेळाडू ठरला.तसेच पुजाराने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १४ हजार धावा पूर्ण केल्या.या यादीत सचिन तेंडुलकर प्रथम  स्थानी आहे. यादीतील १२ खेळाडूंपैकी विराट कोहली आणि पुजारा हे दोनच खेळाडू सध्या कसोटी क्रिकेटमध्ये खेळत आहेत.

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये आजपासून कसोटी मालिकेला सुरुवात झाली. ‘परदेशात खराब कामगिरी करणारा संघ’ हा शिक्का पुसण्यासाठी उत्सुक असलेला भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध गुरुवारपासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटीसाठी सज्ज झाला आहे. गेल्या ७० वर्षांत भारताला ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर विजय मिळवता आलेला नाही.त्यामुळे हा विजय साकारण्याची सर्वोत्तम संधी या मालिकेत भारतीय संघापुढे असणार आहे. भारताची परदेशातील खराब कामगिरी मागील दोन मालिकांमध्येही कायम होती. दक्षिण आफ्रिकेने २-१ अशा फरकाने, तर इंग्लंडने ४-१ असे भारताला हरवले.