टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय

पोलीसनामा ऑनलाइन – भारतीय संघाने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया संघाला २-१ अशा फरकाने हरवले आहे. टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात तब्बल ७२ वर्ष ११ कसोटी मालिका खेळल्यानंतर भारताला प्रथमच या मालिकेमुळे विजयाचा पताका रोवता आला आहे. भारतीय संघाने ॲडलेड व मेलबर्न कसोटी जिंकून मालिकेत आघाडी घेतली होती. सिडनी कसोटीत यजमान ऑस्ट्रेलियाला बरोबरी करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार होती. पण दडपणाचे हे ओझे ते पेलवू शकले नाही. भारतीय संघानेही त्यांना कोणतीच संधी दिली नाही.

भारताने पहिल्या डावातच ६२२ धावांचा डोंगर उभा केला. चेतेश्वर पुजारा ( १९३) आणि रिषभ पंत ( १५९) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने पहिला डाव ७ बाद ६२२ धावांवर घोषित केला. ‘करा किंवा मरा’ या कात्रीत सापडलेल्या ऑस्ट्रेलियाकडून दर्जेदार खेळ झाला नाही. त्यांचा पहिला डाव ३०० धावांवर गडगडला. कुलदीप यादवने सर्वाधिक पाच विकेट घेतल्या. भारताने ऑस्ट्रेलियाला फॉलोऑन देत आपला मालिका विजय पक्का केला. चौथ्या दिवशी बिनबाद ६ धावांवर असताना खेळ थांबला. सोमवारी पाऊस कायम राहिल्याने खेळ झाला नाही.

भारतीय संघ १९४७ मध्ये पहिल्यांदा ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका खेळला होता. त्यानंतर आतापर्यंत ११ मालिकेत भारताला विजय मिळवता आले नाही. त्यापैकी ३ मालिका भारताने बरोबरीत सोडवल्या, तर ८ मालिकांत ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने इतिहास घडविला. ७२ वर्षानंतर भारतीय संघाला ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकता आली.