India vs Australia, 4th Test : रोहित शर्मानं विकेट फेकली : सुनील गावस्करांनी जाहीर वाभाडे काढले, Video

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  India vs Australia, 4th Test : शार्दूल ठाकूर ( Shardul Thakur) व वॉशिंग्टन सूंदर ( Washington Sunder) यांनी कांगारूंचा डाव ३६९ धावांवर संपुष्ठात आणला. ऑस्ट्रेलियाचा संघ एकावेळी ३ बाद २०० धावा अशा मजबूत स्थितीत होता, परंतु टीम इंडियाच्या अनुनभवी गोलंदाजांनी चांगले कमबॅक केले आणि त्यांचा संपूर्ण डाव ३६९ धावांत गुंडाळला. पण, टीम इंडियालाही समाधानकारक सुरुवात करता आली नाही. सेट झालेल्या रोहित शर्मानं ( Rohit Sharma) पुन्हा एकदा आपली विकेट फेकली. फलंदाजांसाठी नंदनवन असलेल्या खेळपट्टीवर भारताच्या अनुनभवी गोलंदाजांनी उल्लेखनीय कामगिरी केली.

दरम्यान, ५ बाद २७४ धावांवरून दुसऱ्या दिवसाची सुरुवात करण्यासाठी टीम पेन व कॅमेरून ग्रीन ही सेट जोडी मैदानावर उतरली. टीम पेननं अर्धशतक पूर्ण करून त्याचे मनसुबे स्पष्ट केले. पण, शार्दूल ठाकूरनं त्याच्या खेळीला ब्रेक लावला. अप्रतिम आऊटसिंग चेंडूवर पेनला खेळण्यास भाग पाडले. पेन १०४ चेंडूंत ६ चौकारांच्या मदतीनं ५० धावांवर माघारी परतला. शार्दूलच्या धक्क्यानंतर वॉशिंग्टन सुंदरनं दुसरा सेट फलंदाज कॅमेरून ग्रीनचा ( ४७) त्रिफळा उडवला. शार्दूल ठाकूर, टी नटराजन व वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. मोहम्मद सिराजला एका विकेटवर समाधान मानावे लागले.

गोलंदाजांच्या कौतुकास्पद कामगिरीनंतर टीम इंडियाच्या फलंदाजांची जबाबदारी होती. शुबमन गिल व रोहित यांनी सावध सुरुवात केली. पण, पॅट कमिन्सच्या चेंडूचा वेगाचा अंदाज बांधण्यास गिल चुकला अन् स्टीव्ह स्मिथनं स्लीपमध्ये सुरेख झेल टिपला. रोहित व चेतेश्वर पुजारा ही जोडी चांगलीच जमली होती. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ४९ धावा जोडल्या, परंतु अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या रोहितला मोठा फटका मारण्याचा मोह आवरता आला नाही. लियॉनचा चेंडू सीमापार मारण्याच्या प्रयत्नात मिचेल स्टार्कच्या हाती झेल देऊन रोहित माघारी परतला. त्यानं ७४ चेंडूंत ६ चौकारांसह ४४ धावा केल्या.

या घाईनंतर सुनील गावस्कर ( Sunil Gavaskar) यांनी रोहितचे जाहीर वाभाडे काढले. ते म्हणाले,”कशाला?, कशाला?, कशाला?; असा फटका मारण्याची गरजच काय. लाँग ऑन आणि डीप स्क्वेअर लेगला फिल्डर असताना असा बेजबाबदार फटका मारण्याची गरज नव्हती. काही वेळापूर्वीच तू चौकार खेचले होतेस, मग घाई कशाला?, तू संघातील सीनिअर खेळाडू आहेस, या बेजबाबदार फटक्यासाठी कोणतेही कारण खपवून घेतले जाणार नाही. ही विकेट गिफ्ट दिलीस.