Ind Vs Aus : ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ 134 धावात गारद, ‘बॉक्सिग डे’ कसोटीत भारताचे वर्चस्व

मेलबर्न : वृत्तसंस्था – पहिल्या कसोटीत ३६ धावात खुर्दा झाल्यानंतर आता भारतीय संघ सावरला असून मेलबर्न कसोटी सामन्यात भारताने १३४ धावात ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ तंबूत पाठविला आहे. त्यात अश्विन आणि बुमराह यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले असून कसोटी पर्दापण करणार्‍या महम्मद सिराजने आपला पहिला कसोटी बळी मिळविला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियातील हा शंभरावा कसोटी सामना आहे. दोन वर्षापूर्वी मेलबर्न येथे झालेला कसोटी सामना जिंकून ऑस्ट्रेलियातील पहिल्या वहिल्या कसोटी मालिका विजय संपादन केला होता.

आज सकाळी ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. परंतु, तो निर्णय ऑस्ट्रेलियाला मानवला नाही. संघाच्या १० धावा असतानाच बुमराहने जो बर्न्स याला विकेटकिपर पंत याच्याकडे झेल देण्यास भाग पाडले. त्यानंतर आश्विनच्या गोलंदाजीवर जडेजाने एक अफलातून झेल घेत मॅथ्यू वेडला तंबून पाठविले. पाठोपाठ स्टीव्ह स्मिथला पुजाराकरवी आश्विनने झेलबाद केले. तेव्हा ऑस्टेलियाची अवस्था ३ बाद ३८ अशी झाली होती.

त्यानंतर ट्रेव्हिस हेड आणि मार्नस लबुशेन यांनी ८६ धावांची भागीदारी करीत ऑस्टेलियाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पुन्हा बुमराह याने हेड याला बाद करुन ऑस्ट्रेलियाला हादरा दिला. त्यानंतर कसोटी पर्दापण करणार्‍या महम्मद सिराज याने शुभमन गिलकरवी लबुशेन याला झेलबाद करुन पहिला कसोटी बळी मिळविला. शुभमन गिल याचाही हा कसोटीतील पहिलाच झेल होता. चहापानापर्यंत ऑस्ट्रेलियाने ५ बाद १३६ धावा केल्या होत्या. दुसर्‍या कसोटीतील पहिल्या दोनही सेशनमध्ये भारताचे वर्चस्व राहिले आहे.