Ind Vs Aus : पांड्या, जडेजाने तारले; भारत 5 बाद 302

कॅनबेरा : वृत्तसंस्था –   सुरुवातीच्या हळू सुरुवातीबरोबर एकामागोमाग विकेट पडत गेल्याने अडचणीत आलेल्या भारताला हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा यांनी तारले. त्यांनी शेवटच्या १० षटकांत तब्बल ११० धावा काढून भारताला ३०२ या समाधानकारक धावसंख्येवर आणून ठेवले.
पहिल्या दोन्ही सामन्यात ऑस्टेलियाच्या डोंगराचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनी नांगी टाकली होती. यावेळी विराट कोहली याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. शिखर धवन आणि शुभमन गिल यांची सुरुवात हळू झाली. धवन १६ धावा काढून बाद झाल्यानंतर कोहली व गिल यांची जोडी जमत असतानाच अगरने गिलला पायचित केले. पाठोपाठ श्रेयस अय्यरही केवळ १९ धावा काढून बाद झाला. केएल राहुल पुन्हा एकदा अपयशी ठरला. एका बाजूने विराट कोहली टिकून असला तरी त्याला धावा जमवताना अडचणी येत होत्या. ३१ व्या षटकात विराट कोहली ६३ धावा काढून बाद झाला होता. भारताच्या केवळ १५१ धावा झाल्या होत्या. तेव्हा भारत अडीचशेचा टप्पा तरी पार करणार का असे वाटत होते.

मात्र, त्यानंतर हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा यांची जोडी जमली. त्यांनी १९ षटकांत १५० धावांची भागीदारी करीत भारताला समाधानकारक धावसंख्या गाठून दिली. पांड्याने ७६ चेंडूत ९२ धावांचा तडका लावला, तर जडेजाने ५० चेडूत ६६ धावा करीत त्याला चांगली साथ दिली.
मागील दोन सामन्यांतील ऑस्टेलियाचा धडाका पाहता ३०२ हे लक्ष्य त्यामानाने कमी असले तरी आता भारतीय गोलंदाजांची परीक्षा आहे. ते ऑस्टेलियन फलंदाजांना रोखण्यात यशस्वी ठरणार का हे पाहावे लागेल.

You might also like