Ind Vs Aus : भारतीय फलंदाजी पुन्हा ठेपाळली, भारत सर्व बाद 244 धावा, ऑस्ट्रेलियाला 94 धावांची आघाडी

सिडनी : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (Ind Vs Aus) तिसर्‍या कसोटी सामन्यात पहिल्या डावात भारताची फलंदाजी पुन्हा एकदा ठेपाळली. कसोटीत तिघे रनआऊट होण्याबरोबरच शुभमन गील, पुजारा वगळता कोणीही खेळपट्टीवर टिकून राहू शकले नाही. परिणामी भारताचा डाव २४४ धावात संपला. ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात ९४ धावांची आघाडी मिळाली आहे. चहापानानंतर भारताने अवघ्या २१ धावात ५ गडी गमावले. तेथेच ऑस्ट्रेलियाला पहिल्या धावात आघाडी मिळणार हे स्पष्ट झाले होते.

कालच्या २ बाद ९६ धावांवरुन आज पुजारा आणि रहाणे यांनी खेळ सुरु केला. कमिन्सने टाकलेल्या एका सुंदर चेंडुवर रहाणे चकला आणि त्याचा क्लीन बोल्ड उडाला. रहाणे याने २२ धावा केल्या. त्याच्या पाठोपाठ विहारी अवघ्या ४ धावांवर रनआऊट झाला. पुजारा आणि ऋषभ पंत यांची जोडी जमली असे वाटत असतानाच ३६ धावावर पंत हेजलवूडच्या बॉलिंगवर वॉर्नरच्या हाती झेल देऊन बाद झाला. पंत याने ३६ धावा केल्या. तेव्हा भारताच्या ५ बाद १९५ धावा झाल्या होत्या. त्याच धावसंख्येवर कमिन्सच्या गोलंदाजीवर पुजारा (५०) तंबूत परतला. पाठोपाठ अश्विन (१०), नवदीप सैनी (३),बुमराह (०) बाद झाले. तेव्हा भारताच्या ९ बाद २१६ धावा झाल्या होत्या. रवींद्र जडेजा याने सिराजच्या मदतीने शेवटच्या गड्यासाठी २८ धावा जोडल्या. सिराज ६ धावा काढून बाद झाला. जडेजा २८ धावांवर नाबाद राहिला.

ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्स याने २९ धावात ४ बळी घेतले. हेजलवूड २ आणि स्टार्क याने एक बळी घेतला. ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात ९४ धावांची आघाडी मिळाली आहे.