IND vs ENG : कोहलीवर ओढवली ‘ही’ नामुष्की; MS धोनीच्या ‘त्या’ विक्रमाशी बरोबरी

अहमदाबाद : वृत्तसंस्था –  इंग्लंड हा सध्या भारताच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यामध्ये ते भारताबरोबर ४ कसोटी, ३ वनडे आणि ५ टी – २० खेळणार आहे. यामधील ४था कसोटी सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरु आहे. पहिल्या दिवशी भारताने इंग्लंडवर वर्चस्व मिळवले होते. पण दुसऱ्या दिवशी मात्र भारताची सुरुवात निराशाजनक झाली आहे. आज सकाळच्या सत्रात पुजारा लगेच बाद झाल्यावर कर्णधार विराट कोहली मैदानात आला. त्याच्याकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा असताना कोहलीने मात्र निराशा केली. या इनिंगमध्ये कोहलीला साधा भोपळाही फोडता आला नाही. आतापर्यंत कसोटी कारकीर्दीत विराट कोहली १२वेळा शून्यावर बाद झाला असून, त्याने धोनीच्या नकोशा विक्रमाशी बरोबरी केली आहे.

आज जेव्हा भारताच्या डावाला सुरुवात झाली तेव्हा चेतेश्वर पुजारा आणि रोहित शर्मा मैदानावर खेळत होते. मात्र पुजारा मैदानावर फार काळ तग धरू शकला नाही. पुजारा बाद झाल्यानंतर कोहली खेळायला आला. मात्र बेन स्टोक्सने विराटला शून्यावर बाद केले.आपल्या कसोटी कारकीर्दीत विराट कोहली १२व्यांदा शून्यावर बाद झाला आहे.

 

विराट कोहली शून्यावर बाद झाल्यानंतर त्याच्या नावावर एका नकोश्या विक्रमाची नोंद झाली. कर्णधार म्हणून विराट ८व्यांदा शून्यावर बाद झाला होता. याचबरोबर विराटने धोनीच्या नकोशा विक्रमाची बरोबरी केली. भारताचा माजी कर्णधार धोनीसुद्धा कसोटीमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व करताना ८ वेळा शून्यावर बाद झाला होता.

इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत विराट कोहली दुसऱ्यांदा शून्यावर बाद झाला आहे. याअगोदर इंग्लंड विरुद्ध २०१४ मध्ये खेळण्यात आलेल्या कसोटी मालिकेतही विराट दोनदा शून्यावर बाद झाला होता. तेव्हा लियाम प्लंकेट आणि जेम्स अँडरसननं विराटला बाद केले होते तर या मालिकेत मोईन अली आणि बेन स्टोक्सनं विराटला बाद केले आहे. यामुळे विराटच्या नावावर निराशाजनक कामगिरीची नोंद झाली आहे.